ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. १४ - टी-२० विश्वचषकासाठी भारत दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार शाहीद आफ्रिदीला भारतप्रेम महागात पडण्याची शक्यता आहे. भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम मिळत असल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी पाकिस्तान मध्ये आफ्रिदीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. एका स्थानिक वकीलाने कायदेशीर नोटीस बजावले आहे. त्यात आफ्रिदीने आपले वक्तव्य माघारी घ्यावे आणि पाकिस्तानी चाहत्याची माफी मागावी असे त्याने नमूद केले आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री पाकिस्तानी संघ कोलकाता येथे दाखल झाला आणि रविवारी पाक खेळाडूची पत्रकार परिषेद झाली होती. त्यावेळी आफ्रिदी म्हणाला होता, मला अन्यत्र कुठेही खेळण्यापेक्षा भारतात खेळण्याचा सर्वाधिक आनंद मिळतो. मी माझ्या करीयरच्या शेवटच्या टप्प्यावर आहे. मला भारतात जितके प्रेम मिळाले ते आयुष्यभर स्मरणात राहील. आम्हाला पाकिस्तानातही इतके प्रेम मिळाले नाही. या वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये त्याच्यावर चारी बाजूने टीका होत आहे. पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींने सोशल मीडियावर तर आफ्रिदीला अक्षरश: शिव्या घालत आहेत.
त्याचप्रमाणे, भारतानं आपल्याला काय दिलं, जरी तुम्ही भारताच्या दौऱ्यावर असाल तरी सत्य बोला, मागच्या पाच वर्षांमध्ये भारतानं आपल्यासाठी आणि आपल्या क्रिकेटसाठी काय केलं. लाज वाटते तुझी! अश्या शब्दात पाकचा माजी कर्णधार जावेद मियाँदादने आफ्रिदीवर नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहसिन शेख यानंही या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. आफ्रिदी आणि मलिक हे वरिष्ठ खेळाडू आहेत, असं वक्तव्य करताना त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मोहसिन म्हणाला आहे.