सिंगापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर अकरा दिवसांनी संबंधित रुग्णांपासून कोणालाही लागण होण्याचा धोका उरत नाही, असे येथे नव्याने केलेल्या एका पाहणीत आढळून आले आहे.
सिंगापूरमधील नॅशनल सेंटर फॉर इन्फेक्शिअस डिसिजेस व अकॅडमी आॅफ मेडिसिन्स या दोन संस्थांतील शास्त्रज्ञांनी कोरोनाच्या ७३ रुग्णांच्या केलेल्या संयुक्त पाहणीतून हा निष्कर्ष काढला आहे. एखाद्याला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर अकरा दिवसांनी त्या व्यक्तीपासून अन्य कोणालाही संसर्ग होण्याचा धोका शिल्लक राहत नाही. या निष्कर्षामुळे कोरोनाग्रस्तांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी कधी देण्यात यावी याबद्दलच्या धोरणात बदल होण्याची शक्यता आहे. ताज्या पाहणी अहवालानुसार कोरोना रुग्णांच्या उपचार पद्घतीतही काही बदल करता येतील का, याची चाचपणी सिंगापूर सरकारने सुरू केली आहे.
सिंगापूरमध्ये ३१ हजारांहून अधिक रुग्ण असून,१३ हजारांहून अधिक म्हणजे ४५ टक्के लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. त्यांना रुग्णालयातून घरी जाऊ देण्यात आले. या देशात शनिवारी ६४२ नवे रुग्ण आढळून आले. सिंगापूरमध्ये इतर देशांतून नोकरी-व्यवसायासाठी आलेल्यांची संख्याही काही लाखांत आहे. यांच्या वस्त्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. भारतातूनही काही लाख लोक सिंगापूरमध्ये रोजीरोटीसाठी गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीची त्यांच्या कुटुंबीयांना चिंता लागली आहे.
शाळा सुरू होणार २ जूनपासून
सिंगापूरमधील शाळा २ जूनपासून सुरू होणार आहेत. त्याआधी शाळांतील कर्मचारी वर्गाचे स्क्रीनिंग करण्यात येत आहे. त्यामध्ये एका शाळेतील २ कर्मचारी कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले.