वॉशिंग्टन : चार पिढ्यांपासून मुलीसाठी उत्सुक असलेल्या अमेरिकेतील सेटल कुटुंबासाठी गेल्या जून महिन्यातील उकाडाही शीतल गुलाबी बनला होता. साउथ कॅरोलिना भागात राहणारे विल सेटल यांच्या घरात १३७ वर्षांनंतर २५ जून रोजी मुलीचा जन्म झाला. विल यांनी आपल्या या मुलीचे नाव कार्टर लुुईस सेटल ठेवले. विल म्हणाले की, कार्टर नाव त्यांच्या मुलीला दृढ इच्छाशक्ती देण्यास उपयोगी पडेल. कारण तिने सगळे पुरुषच असलेल्या अशा कुटुंबात जन्म घेतला आहे. विल सेटल हे जाहिरात कंपनीमध्ये सेल्समनचे काम करतात. मुलगी जन्माला आल्याचा आनंद फार मोठा असल्यामुळे त्यांच्या मित्रांनी महामार्गांवर मुलीचे स्वागत व अभिनंदनाचे १२ फूट लांब आणि २४ फूट रुंद होर्डिंग लावले. त्यानंतर विल यांना सगळ््या शहरातून अभिनंदनाचे फोन येऊ लागले.खासगी रुग्णालयात कार्टर सेटल हिचा जन्म झाला, तेव्हा तिचे वजन तीन किलो होते. तिचे बाबा विल ३८ तर आई केलेन ३५ वर्षांची आहे. केलेन यांचे कार्टर हे पहिलेच अपत्य आहे. कुटुंबात पहिल्यांदाच आलेल्या मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव सगळे सेटल कुटुंबीय एकत्र येऊन साजरा करीत आहेत.
१३७ वर्षांनी कुटुंबात जन्मली मुलगी, होर्डिंग लावून केले स्वागत
By admin | Published: July 15, 2017 12:30 AM