बोगोटा: कोलंबियात विमान अपघाताला पाच आठवडे उलटल्यानंतर चार बालके जिवंत सापडली आहेत. यातील एक बालक अवघ्या एक वर्षाचा आहे. हे विमान घनदाट जंगलात कोसळून सात प्रवाशांपैकी तीन प्रौढांचा मृत्यू झाला होता. त्यांचे मृतदेहही हाती लागले होते, मात्र चार बालके बेपत्ता होती. त्यामुळे शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर ४० दिवसानंतर बचाव पथकाला ही बालके जंगलात सुखरूप आढळली. १ मे रोजी सेसना २०६ हे विमान ॲमेझोनास प्रांतातील अराकुआरा येथून निघून सॅन जोसे डेल ग्वाविअरे या शहराकडे जात होते. विमानात एकूण सात जण होते.
विमान जंगलावरून जात असताना इंजिन काम करेनासे झाल्यानंतर हे विमान घनदाट जंगलात कोसळले. १ मे रोजी घडलेल्या या दुर्घटनेत वैमानिक आणि मुलांची आई मॅग्डालेना मुकुटी यांच्यासह तीन प्रौढांचा मृत्यू झाला व त्यांचे मृतदेह विमानातच सापडले. तर १३, ९, ४ वर्षे आणि १२ महिने वयोगटातील मुले ५ आठवड्यांनंतर जिवंत आढळली.
मुले कशी जगली?
- एवढे दिवस जंगलात राहिल्याने मुले अशक्त झाली आहेत, मात्र डॉक्टरांच्या मदतीने त्यांची प्रकृती सुधारेल, असे राष्ट्रपती गुस्तावो पेट्रो यांनी सांगितले. एवढ्या कमी वयाच्या मुलांनी जंगलात स्वत:चा बचाव केल्याचे पाहून त्यांना आनंद झाला.
- बचाव पथक आणि शोधक श्वानांनी मुलांना शोधून काढले. बचाव पथकाला मुलांजवळ काही फळे सापडली आहेत. ही फळे खाऊन त्यांनी दिवस काढले. ते सर्व जंगली वनस्पतींनी बनवलेल्या आश्रयस्थानात राहत होते. कोलंबियन लष्कर व हवाई दलाची विमाने, हेलिकॉप्टर बचाव कार्यात सहभागी झाले होते.