क्वालालम्पूर : मलेशियाच्या जंगलामध्ये कार अपघातात गंभीर झालेल्या भारतीय वंशाच्या ३३ वर्षीय इसमाने तीन दिवस जंगलात सरपटत काढून मदत मिळविली आणि त्याचे प्राण वाचल्याची चमत्कारिक घटना घडली. त्याचा मित्र असलेला अन्य एक भारतीय मात्र या अपघातात ठार झाला.गेल्या रविवारी मध्य मलेशियातील बिडोरजवळ हा अपघात घडला. कारचालक निकोलस अँन्ड्रयू हा मूळ भारतीय कार चालवत असताना त्याने नियंत्रण गमावले. त्याची कार २0 मीटर खोल दरीतील नदीत कोसळली. त्याचा उजवा हात आणि पाय जायबंदी झाल्याने त्याच्याकडे प्रवाहासोबत वाहत जाण्याखेरीज अन्य मार्ग नव्हता. त्याचा मित्र आर. थियागराजन (३४) हा जागीच मृत्युमुखी पडला होता.या काळात निकोलसला नदीतील पाणी पाण्याशिवाय कोणताही आधार नव्हता. त्याने सरपटत पाण्याबाहेर येत झोपण्यासाठी झाडाचा आधार घेतला. निकोलस हा भावाच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्यानंतर घरी परतत असताना एका दरीजवळ त्याने कारवरील नियंत्रण गमावले. -गावकर्यांनी वाचविले..अपघातानंतर सारेच संपले असे वाटत होते. मित्राकडून कोणताच प्रतिसाद नव्हता. जखमी झाल्यामुळे मी मदतीसाठी आरडाओरड केली. नदीच्या बाहेर येता येत नव्हते. त्यामुळे प्रवाहासोबत तरंगत, सरपटत जाण्याचा मार्ग अवलंबला अशी माहिती त्याने न्यू स्ट्रेटस् टाइम्स या वृत्तपत्राला कैफियत सांगताना दिली. तीन दिवस मी एखाद्या गावाच्या किंवा वस्तीच्या शोधात होतो. एका ठिकाणी गावकर्यांचा आवाज ऐकून मी दिलेली हाक त्यांच्या कानी पडली. त्याने लगेच मला बाहेर काढत माझे प्राण वाचविले, असे त्याने सांगितले. निकोलस हा लष्कराच्या छावणीत काम करतो. (वृत्तसंस्था)
अपघातानंतर 'तो' तीन दिवस सरपटत राहिला
By admin | Published: October 25, 2014 9:42 AM