वॉशिंग्टन - संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं दहशतवादी आणि दहशतवादी संघटनांची एक यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये 139 पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या नावाचा समावेश आहे. मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीमध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाचाही समावेश आहे.
डॉन न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांसोबत कार्यरत आहेत किंवा संलग्न आहेत, अशा दहशतवाद्यांचा यादीमध्ये समावेश आहे. यादीमध्ये पहिलं नाव अयमान अल जवाहिरीचे आहे, ज्याला अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेनचा उत्तराधिकारी मानले जाते. संयुक्त राष्ट्रानं असा दावा केला आहे की, जवाहिरी सध्या अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमा रेषेजवळच वास्तव्यास आहे. या यादीमध्ये त्याच्या साथीदारांच्याही नावाचा समावेश आहे. यादीमध्ये अशाही दहशतवाद्यांचे नाव आहे ज्यांना पाकिस्तानातून अटक करुन अमेरिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यादीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकरच्या नावाचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनुसार, दाऊदजवळ वेगवेगळ्या नावे पाकिस्तानी पासपोर्ट आहे. दाऊदचा कराचीतील नूराबाद परिसरात बंगलादेखील आहे. याशिवाय ‘लष्कर’शी संबंधित अल मन्सूरियन, पासबान- ए- काश्मीर, जमात उद दावा, फलाह- ए- इन्सानियत फाऊंडेशन या संघटनांचाही दहशतवादी संघटनांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.