अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन यांनी नुकत्याच स्थापन झालेल्या AUKUS फोरमच्या माध्यमाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्यासाठी एकत्रितपणे काम केले जाईल, अशी मोठी घोषणा केली आहे. इंडो-पॅसिफिक भागातील चीनची आक्रमक वृत्ती पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी संयुक्त निवेदन जारी करत, तिन्ही देश हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे बनवतील, एकमेकांना महत्त्वाच्या माहितीचे आदानप्रदान करतील, याचबरोबर संरक्षण क्षेत्रात नव्या सुरुवातीसाठी एकमेकांना सहकार्यही करतील, असे म्हटले आहे.
चीनचा तीळपापड -या निर्णयानंतर चीनचा जबरदस्त तीळपापड उडाला आहे. चीनने जगात आणखी एक युक्रेन तयार करण्याची धमकी दिली आहे. संयुक्त राष्ट्रात (UN) चीनचे मुत्सद्दी म्हणाले, 'अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने युक्रेनसारखे दुसरे नवीन संकट निर्माण करणे टाळावे.'
काय असते हायपरसोनिक क्षेपणास्त्र?हायपरसोनिक क्षेपणास्त्र एक असे क्षेपणास्त्र आहे, जे क्षणात शत्रूचा विनाश करू शकते. जगातील कुठलीही संरक्षण यंत्रणा या क्षेपणास्त्रांना रोखण्यास सक्षम नाही. अमेरिका, रशिया आणि चीन हे तिन्ही देश हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. पेंटागॉनने 2023 च्या बजेटमध्ये 4.7 अब्ज US $ एवढा अर्थसंकल्प केवळ हायपरसोनिक शस्त्रे विकसित करण्यासाठी आणि संशोधनासाठी राखून ठेवला आहे.