INDIA-Maldives Clashes: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारतासह पंतप्रधान मोदींविरोधात टिप्पणी केली. याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. भारतीयांनी ‘बायकॉट मालदीव’हा ट्रेंड सुरू केला असून त्यात सेलिब्रिटींनीही उडी घेतली असून, चलो लक्षद्वीप ट्रेड सुरू झाला आहे. मालदीवमधील राजकीय नेत्यांनी भारतावरील टीकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे मालदीवमध्ये राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी चर्चा रंगू लागली आहे.
भारताच्या ताकदीकडे दुर्लक्ष करणे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना महागात पडू शकते. एकीकडे मालदीवचे विरोधक तेथील सरकारवर भारतासोबतचे संबंध बिघडल्याचा आरोप करत आहेत आणि आता राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी सुरू आहे. मालदीवचे अल्पसंख्याक नेते अली अझीम यांनी अशा प्रकारची मागणी केली आहे. मुइज्जू यांना पदावरून हटवण्यासाठी मदत करावी. मालदीवच्या परराष्ट्र धोरणात स्थिरता राखण्यासाठी आमचा मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) पक्ष कटिबद्ध आहे, असे अली अझीम यांनी म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यास ते तयार आहेत का, अशी विचारणा अली यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना केली आहे.
जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा तेव्हा भारत मदतीसाठी धावून आला
मालदीव टुरिझम असोसिएशनने मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. आपल्या मंत्र्यांच्या पंतप्रधान मोदी आणि भारतातील लोकांविरुद्ध केलेल्या वक्तव्याचा निषेध करते, असे एका निवेदनात असोसिएशनने म्हटले आहे. तसेच भारत जवळचा शेजारी आणि मित्र देश आहे. इतिहासात जेव्हा जेव्हा आपला देश संकटात सापडला. तेव्हा पहिली मदत भारतातून आली. सरकारसोबतच आम्ही भारतातील जनतेचेही आभारी आहोत की, आमच्याशी इतके घनिष्ठ संबंध निर्माण केले आहेत. मालदीवच्या पर्यटन क्षेत्रात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. पर्यटन क्षेत्राला कोरोनानंतर सावरण्यास खूप मदत झाली आहे. मालदीवसाठी भारत ही प्रमुख बाजारपेठ आहे, असेही असोसिएशनने म्हटले आहे.
दरम्यान, सदर प्रकाराबाबत मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यमान राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी या प्रकाराबाबत भारताशी चर्चा करून आपली बाजू मांडावी. सरकार या विधानाशी सहमत नसल्याचे स्पष्ट करावे, असे त्यांनी म्हटले. तर, मालदीवमध्ये आदरातिथ्य, शांतता, सहिष्णुतेच्या मुद्यावर पर्यटन व्यवसाय विकसित झाला आहे. भारतासह जगभरातील कंपन्यांनी येथे मोठी गुंतवणूक केली. झालेला प्रकार हा अत्यंत चुकीचा असल्याचे माजी राष्ट्राध्यक्ष अहमद अदीब यांनी म्हटले.