आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त असलेल्या येमेनमधील राष्ट्रपती परिषदेने देशात सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे. सोमवारी राष्ट्रपती परिषदेने देशाचे पंतप्रधान मईन अब्दुल मलिक सईद यांना पदावरून बरखास्त केले आहे. सईद हे २०१८ पासून पंतप्रधानपदावर होते. त्यांच्या जागी आता देशाचे परराष्ट्रमंत्री अहमद अवद बिन मुबारक यांची नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती परिषदेने उचलेलं हे पाऊल अनेकांसाठी धक्कादायक ठरले आहे.
बिन मुबारक हे सौदी अरेबियाचे निकटवर्तीय मानले जातात. राष्ट्रपती परिषदेने या बदलामागे कुठलंही कारण सांगितलेलं नाही. येमेनमध्ये केवळ राजकीय उलथापालथ झालेली नाही तर २०१४ पासूनच येथे गृहयुद्ध सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेकडून हुती बंडखोरांविरोधात कारवाई सुरू असतानाच राष्ट्रपती परिषदेने हा निर्णय घेतला आहे. २०१४ मध्ये हुती बंडखोरांनी येमेनची राजधानी सानावर कब्जा केला होता. तेव्हापासून देशामध्ये अस्थिरता आहे.
हुती बंडखोरांच्या या कारवाईनंतर सौदी अरेबियाचा पाठिंबा असलेल्या लोकांनी या बंडखोरांविरोधात २०१५ मध्ये लढाई सुरू केली होती. देशामध्ये पुन्हा एकदा सरकारचं शासन स्थापित व्हावं हा त्यामागचा हेतू होता. मात्र या गृहयुद्धामुळे येमेन पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहोचला आहे. येमेन हा देश अरब राष्ट्रांमधील सर्वात गरीब देश असून, गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे येथे १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.