सियोल - जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक प्रगत देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान पहिल्यांदाच कोरोना महामारीचा सामना करणाऱ्या उत्तर कोरियामध्ये शुक्रवारी रहस्यमयी तापाने ग्रस्त असलेल्या 21 जणांचा मृत्यू झाला आहे. वृत्तसंस्थेने शनिवारी हे वृत्त दिले आहे. नवीन मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत की नाही हे KCNA वृत्तसंस्थेने सांगितले नाही. तथापि, KCNA ने शुक्रवारी पुष्टी केली की मृतांपैकी एकाचा कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे मृत्यू झाला आहे.
KCNA ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिलच्या अखेरीपासून देशात तापाने आजारी असलेल्या 2 लाख 80 हजारांहून अधिक लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. तापामुळे आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. KCNA ने सांगितले की, शनिवारी पहाटे सत्ताधारी पक्षाची बैठक झाली, ज्यामध्ये किम जोंग उन देखील उपस्थित होते. या बैठकीत एक अहवाल सादर करण्यात आला, ज्यामध्ये हा आजार देशाच्या स्थापनेनंतरची सर्वात मोठी आपत्ती म्हणून समोर आला असला तरी तो टाळता येऊ शकतो, असं म्हटलं होतं.
सध्या या रहस्यमय़ी तापाचे कारण समजू शकलेले नाही. मात्र, ताप येण्यामागे कोरोना हे प्रमुख कारण असावे असा संशय आहे. तत्पूर्वी, उत्तर कोरियाचेकिम जोंग उन यांनी गुरुवारी राष्ट्रीय लॉकडाउन आदेश दिल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी अँटी-व्हायरस कमांड सेंटरला भेट दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. "देशात सर्वात मोठी आपत्कालीन घटना घडली आहे. फेब्रुवारी 2020 पासून दोन वर्ष आणि तीन महिने देशाला सुरक्षित ठेवण्यात यश आलं होतं. पण आता यात घुसखोरी झाली आहे", असं सरकारी माध्यमांनी सांगितलं आहे.
उत्तर कोरियात आता नेमके किती रुग्ण आढळले आहेत याची माहिती देण्यात आलेली नाही. देशात अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि संपूर्ण जगापासून वेगळं राहण्याच्या आपल्या भूमिकेमुळे किम जोंग चिंतित आहेत. या दोन कारणांमुळे कोरोनाचा वाईट प्रभाव संपूर्ण देशावर पडू शकतो असं किम जोंग यांना वाटतं. कोरोनाला देशाच्या सीमेवरच रोखण्यात यशस्वी झाल्याचा दावा आतापर्यंत उत्तर कोरिया करत आलं होतं. पण आता अधिकृतरित्या कोरोना रुग्ण आढळल्याचं मान्य केल्यानंतर भविष्यात होणाऱ्या घटनाक्रमांवर सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.