इस्लामाबाद - 2011 रोजी जेव्हा ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला तेव्हा त्याच्या मागे तीन मुले होती. यामधील एकाने सर्व गोष्टींचा त्याग केला होता, तर एकाचा मृत्यू झाला. तिस-या आणि सर्वात छोट्या मुलाने मात्र लादेनच्या पावलावर पाऊल ठेवत आपली वाटचाल सुरु केली. हमजा लादेन असं त्याचं नाव असून लादेनने तयार केलेल्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुखांपैकी एक आहे. लवकरच त्याला अधिकृतपणे संघनटेचा प्रमुख करुन सर्व जबाबदारी सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. ब्रिटीश मीडियाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, संयुक्तपणे कारवाई करत हमजा लादेनचा खात्मा करण्याची तयारी सुरु करण्यात आली असून शोधमोहीम सुरु झाली आहे.
रिपोर्टनुसार, सीरियामध्ये सक्रीय असलेल्या सैनिकांनी तयार केलेल्या मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांच्या यादीत हमजा लादेनचा क्रमांक पहिला आहे. ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाल्यानंतर हमजा लादेनलाच अल-कायदाचं प्रमुख बनवलं जाऊ शकतं अशी शक्यता सीआयएनेदेखील वर्तवली आहे. ओसामा लादेनने 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. 10 वर्षानंतर 1 मे 2011 च्या मध्यरात्री पाकिस्तानात देशाची राजधानी इस्लामाबादपासून केवळ ६५ किमी अंतरावरील अबोटाबादमध्ये अमेरिकी नेव्ही सील कमांडोंनी मस्तकात आणि छातीवर बंदुकींतून गोळ्या झाडून ओसामा लादेनला ठार मारले.
'द एक्स्प्रेस ट्रिब्यून'ने दिलेल्या वृत्तानुसार, हमजा लादेन आता पुर्णपणे सक्रीय झाला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. आपल्या आई, वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी पश्चिमी देशांवर हल्ला करण्याची योजनादेखील हमजा लादेन आखत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. 2015 रोजी लंडनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची स्तुती करत असताना हमजा एका व्हिडीओत दिसला होता. हमजा सीरियामध्ये असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली असून, त्यानंतरच सीआयएने त्याचं नाव अमेरिकेच्या टेरर वॉच लिस्टमध्ये सामील केलं आहे.
ब्रिटीश मीडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, मे महिन्यात हमजा लादेनची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली असून, पश्चिम देशांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला आहे. लष्कराचे जवळपास 40 विशेष हवाई सैनिक हमजाचा शोध घेण्यासाठी गुप्त मोहिमेवर आहेत.