वॉशिंग्टन: पाकिस्तानची गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयनं दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार करण्यात अमेरिकेला मदत केली होती, असं पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलं आहे. गेल्या आठ वर्षांपासून पाकिस्ताननं लादेनच्या वास्तव्याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नव्हती, अशी भूमिका घेतली होती. मात्र आता पाकिस्ताननं पहिल्यांदाच लादेनच्या वास्तव्याची माहिती होती याबद्दल कबुली दिली आहे. यामुळे पाकिस्तानची मोठी नाचक्की झाली आहे.पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या इम्रान खान यांनी फॉक्स न्यूजला मुलाखत दिली. लादेनचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉक्टरची सुटका करणार का, असा प्रश्न खान यांना मुलाखतीत विचारण्यात आला. यावर हा भावनिक प्रश्न असून पाकिस्तान शकील आफ्रिदीला हेर समजतो, असं उत्तर खान यांनी दिलं. लादेनचा शोध घेण्यासाठी आफ्रिदी वैद्यकीय तपासणी मोहिमेचं कारण देऊन घराघरांना भेटी देत होते. त्यातूनच लादेनचा ठावठिकाणा अमेरिकेला समजला. यानंतर २ ऑक्टोबर २०११ च्या मध्यरात्री अमेरिकेच्या स्पेशल टीमनं लादेनचा खात्मा केला. सध्या आफ्रिदी पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. लादेन प्रकरणावर भाष्य करताना खान यांनी मोठी कबुली दिली. 'ओसामा बिन लादेन लपून बसलेल्या जागेची माहिती आयएसआयनं दिली होती. तुम्ही याबद्दल सीआयएला विचारु शकता. लादेनच्या सुरुवातीच्या ठावठिकाण्याची माहिती आयएसआयकडून देण्यात आली होती,' असा दावा खान यांनी मुलाखतीत केला. खान यांच्या या दाव्यामुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवली आहे. लादेन पाकिस्तानात नाही, त्याच्या वास्तव्याबद्दल कोणतीही माहिती आमच्याकडे नाही, अशी भूमिका वारंवार पाकिस्ताननं घेतली होती.
होय, आम्हाला लादेनच्या वास्तव्याची माहिती होती; पाकिस्तानची पहिल्यांदाच कबुली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 4:15 PM