ज्या समाजात स्त्रियांचं स्थान उच्च असतं, जिथे महिलांचा सन्मान, आदर केला जातो, त्या त्या समाजाची, देशाची एवढंच नव्हे तर घराचीही उन्नती होते, हा इतिहास आहे. वेळोवेळी ते सिद्धही झालं आहे. पण अनेक ठिकाणी महिलांना दुय्यम लेखलं जातं, त्यांना पुरुषांपेक्षा खालचं स्थान दिलं जातं, कमी मानलं जातं, हीदेखील वस्तुस्थिती आहे. कोणताही समाज आणि कोणताही देश त्याला अपवाद नाही.
भारतात तर स्त्रियांना देवीचं रूप मानण्यात आलं आहे. लक्ष्मी, पार्वती, सरस्वती व दुर्गेच्या रूपात तिची पूजाही केली जाते. आपण कुठल्याही क्षेत्रात कमी नाही, हेही महिलांनी वेळोवेळी सिद्ध केलं आहे; पण तरीही त्यांना सन्मान, आदर मिळतो का, हा संशोधनाचाच विषय आहे. जगभरात महिलांवर अत्याचार, अन्याय आणि त्यांच्या अवमानाच्या घटना सातत्याने घडतच आहेत.
अमेरिकेत नुकत्याच झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे हा देश सध्या संपूर्ण जगात चर्चेत आहे. डोनाल्ड ट्रम्प मोठ्या दिमाखात निवडून आले. अमेरिकेतील स्त्री-पुरुष समानतेची, तिथे महिलांना असणाऱ्या हक्कांची सगळीकडे चर्चा, वाहवा होते, पण परिस्थिती खरंच तशीच आहे का? ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर तिथलं चित्र आणखी स्पष्ट होत आहे आणि महिला आपल्याविरुद्धच्या अन्यायानं किंवा आपल्यावरील अन्याय अधिकच वाढेल, या भीतीनं हवालदिल झाल्या आहेत.
त्यामुळेच अमेरिकेत महिला हक्कांविषयी आंदोलनंही सुरू आहेत. अमेरिकेतील महिलांना सर्वाधिक भीती आहे ती तिथल्या ‘मागास’ कायद्यांविषयी. अमेरिकेतल्या महिलांना गर्भपाताचा अधिकार नाही. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर गर्भपातासंबंधातील कायदे आणखी कडक आणि जाचक होतील, अशी भीती तिथल्या महिलांना वाटते आहे.
त्याचा काय परिणाम व्हावा? आपण गर्भवती झालो आणि गरज असतानाही आपल्याला गर्भपाताचा अधिकार नाकारला गेल्यास आगीतून फुफाट्यात जाऊन पडण्याची वेळ येऊ नये म्हणून तिथल्या महिलांनी गर्भनिरोधक औषधे खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकेत कोट्यवधी रुपयांची गर्भनिरोधक औषधं विकली गेली. त्यात अर्थातच गर्भनिरोधक गोळ्यांचा वाटा सर्वाधिक आहे. त्याबरोबरच अमेरिकेत आपत्कालीन गर्भनिरोधक औषधांची विक्रीही अतिशय जोरात सुरू आहे.
किती असावी ही विक्री? - अमेरिकेतील गर्भनिरोधक औषधांची विक्री पाहून भल्याभल्यांचे, तिथल्या तज्ज्ञांचे, एवढंच काय, गर्भनिरोधक औषधं बनवणाऱ्या आणि विकणाऱ्या कंपन्यांचेही आश्चर्यानं डोळे पांढरे व्हायची वेळ आली आहे. अमेरिकेत ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होती. ट्रमच निवडून येतील, असा अंदाज तोपर्यंत सर्वांना आला होता.
अमेरिकन महिलांनाही त्याची जाणीव झाली आणि ट्रम्प प्रत्यक्ष निवडून येण्याआधीच गर्भनिरोधक औषधांची खरेदी त्यांच्याकडून सुरू झाली. ही औषधं बनवणारी Wisp ही अमेरिकेतील एक प्रमुख कंपनी. केवळ तीनच दिवसांत म्हणजे पाच, सहा आणि सात नोव्हेंबर या काळात या औषधांच्या विक्रीतून त्यांनी एक हजार टक्के नफा कमावला! याच दरम्यान गर्भनिरोधक औषधांची खरेदी तब्बल १६५० टक्क्यांनी वाढली! याशिवाय गर्भपातासंदर्भातील इतर औषधांची विक्रीही ६०० टक्क्यांनी वाढली!
अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात या औषधांची मागणी वाढेल, याची कोणालाही कल्पना नव्हती. या औषधांची गरज पडली तर नंतर धावाधाव, पळापळ नको, ट्रम्प निवडून आल्यानंतर ही औषधं मार्केटमधून अचानक गायबही होऊ शकतात, त्यामुळे ती हाताशी असू द्यावीत, गरजेपेक्षाही थोडी अधिकच घेऊन ठेवावीत, या विचारानं महिलांनी या औषधांचा अक्षरश: साठा करायला सुरुवात केली.
महिलांकडून या औषधांची खरेदी अजूनही सुरूच आहे. या औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांचीही त्यामुळे चंगळ झाली आहे. त्यांनी आपली उत्पादन क्षमता तर वाढवलीच, पण टेलीमेडिसिन आणि ऑनलाइन सर्व्हिसच्या माध्यमातून या औषधांचा आक्रमक प्रचारही सुरू केला नाही. जितक्या वेगानं ‘बर्थ कंट्रोल पिल्स’ महिलांच्या घरापर्यंत, त्यांच्या प्रत्यक्ष हातात पोहोचवता येईल, याकडे त्यांनी लक्ष पुरवायला सुरुवात केली आहे. ज्यांना ‘गरज’ नाही, अशाही महिलांनी ‘इमर्जन्सीला असू द्याव्यात’ म्हणून या गोळ्या घेऊन ठेवल्या आहेत!
अमेरिकन बायका स्थलांतराच्या तयारीत!
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर तिथे लगेचंच एक सर्व्हेही झाला. या सर्वेक्षणात दिसून आलं की, सुरक्षित गर्भपात आणि त्याच्याशी निगडित आरोग्यसेवा आता मिळणार नाहीत, अशी भीती बहुसंख्य महिलांच्या मनात आहे. त्यामुळे अनेक महिलांनी ज्या राज्यांत गर्भपातासंबंधातील कायदे थोडे शिथिल आहेत, अशा ठिकाणी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूणच अमेरिका सध्या नाजूक वळणावर आहे.