China vs USA, Spy Balloon: अमेरिकेने सोमवारी चीनच्या गुप्तहेर बलूनचे अवशेष परत करण्यास नकार दिला. यासोबतच अमेरिकन लष्कराने फुग्याचे अवशेष गोळा करण्यासाठी प्रयत्नांना वेग दिला आहे. चिनी गुप्तहेर फुगा अमेरिकेच्या आकाशात मोंटाना ते दक्षिण कॅरोलिना या विभागात गेल्या आठवड्यात अनेक दिवस उडताना दिसला होता आणि शनिवारी दक्षिण कॅरोलिनामध्ये अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर तो खाली पाडण्यात आला. फुग्याबद्दल मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे, व्हाईट हाऊसने सोमवारी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले की हा एक गुप्तहेर फुगा आहे आणि त्या फुग्याने आंतरराष्ट्रीय नियम आणि देशांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन केले आहे.
अमेरिकन सैन्य समुद्रात अवशेष शोधण्याच्या तयारीत
नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी म्हणाले, "आम्ही त्या फुग्याचे अवशेष परत करण्याच्या अजिबात विचार करत नाही. अशी आमची कोणतीही योजना नाही." ते म्हणाले की अमेरिकन सैन्याने समुद्रातून काही अवशेष मिळवले आहेत आणि ते अजूनही त्यांचा शोध घेत आहेत. याआधी शनिवारी, लढाऊ विमानाने फुगा खाली पाडण्यापूर्वी, किर्बी म्हणाले की, त्याबद्दल बरीच महत्त्वाची माहिती गोळा केली गेली आहे.
अमेरिकेची कठोर भूमिका
व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी करिन जीन पिअर यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी लष्करी, गुप्तचर समुदायाला बलूनबद्दल माहिती गोळा करण्यास सांगितले आहे जेणेकरून चीनच्या क्षमतेबद्दल अधिकाधिक माहिती मिळू शकेल. तसेच, नॉर्दर्न कमांडचे कमांडर जनरल ग्लेन व्हॅनहर्क यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा फुगा २०० फूट उंचीवर होता. त्यात अनेक हजार पौंडांचा पेलोड होता, विशेषत: प्रादेशिक जेट विमानाचा आकार होता.