काबूल:तालिबान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेच्या सैन्याने माघार घेतल्यानंतर तालिबाननेअफगाणिस्तानच्या एकेक भागावर ताबा मिळवायला सुरुवात केली आणि अखेर काबूलमध्ये प्रवेश केला. आता संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता असणार आहे. दरम्यान, तालिबाननं आपल्या सर्व सैनिकांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन याने ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, तालिबानने आपल्या सैनिकांना कुणाच्याही घरात परवानगीशिवाय प्रवेश न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, नागरिकांच्या जीवाची, मालमत्तेची आणि सन्मानाची हानी होणार नाही, याची खबरदारी घेण्यास सांगितलं आहे.
त्याआधी रविवारी सुहेल शाहीनने सांगितलं होतं की, तालिबान अफगाणिस्तानमध्ये "खुले, सर्वसमावेशक इस्लामिक सरकार" बनवण्याच्या उद्देशाने चर्चा करत आहे. दरम्यान, तालिबानच्या काबूलमधील प्रवेशानंतर राष्ट्रपती अशरफ गनीने रविवारी पलायन केलं आहे. त्यानंतर तालिबानने राष्ट्रपती भवनावरही ताबा मिळवला. आता लवकरच तालिबान नवीन सरकारीच घोषणा करू शकतं.
देशाचं नाव बदलणारतालिबानच्या एका अधिकाऱ्यानं सांगितल्यानुसार, तालिबान लवकरच काबूलमधील राष्ट्रपती भवनातून अफगाणिस्तानचे नाव बदलून 'इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान' केल्याची घोषणा करेल. यापूर्वी अफगाणिस्तानात तालिबानचे सरकार असतानाही अफगाणिस्तानचं हेच नाव होतं.