ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - उरी दहशतवादी हल्ल्यावर शोक व्यक्त करण्यास नकार देणा-या पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने अखेर मौन सोडल्यानंतर अभिनेत्री माहिरा खानलाही जाग आली आहे. माहिरा खानने फेसबूकच्या माध्यमातून आपलं मत माडलं असून दहशतवादाचा निषेध केला आहे. मात्र फवाद खानप्रमाणे माहिरा खाननेदेखील उरी हल्ल्याबाबत चकार शब्दही काढलेले नाही. फेसबूक पोस्टच्या माध्यमातून माहिरा खानने आपलं मत मांडलं आहे.
'गेली पाच वर्ष अभिनेत्री म्हणून काम करत असताना आपल्या देशाचा मान अखंड राहावा यासाठी मी पुरेपर प्रयत्न केले आहेत. जगभरात कुठेही पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करत असताना मी जितके शक्य झाले तितके प्रयत्न केले. पाकिस्तानी आणि जगाची नागरिक असल्याच्या नात्याने मी दहशतवादाचा निषेध करते, मग ती कोणतीही जमीन असो. युद्ध आणि रक्तपातामुळे कोणताही आनंद होणार नाही. आपल्या स्वप्नातील जग सत्यात उतरावं आणि प्रत्येकाने शांततापूर्ण जगाची अपेक्षा करावी अशी प्रार्थना करते', असं माहिरा खानने लिहिलं आहे.
उरी हल्ल्यानंतर मनसेने फवाद खान, माहिरा खान, अली जाफर, आतिफ असलम यांच्यावर निशाणा साधून त्यांना 48 तासात भारत सोडण्याचं अल्टिमेटम दिलं होतं. मात्र या संपुर्ण पोस्टमध्ये माहिरा खानने कोठेही उरी हल्ल्याचा किंवा भारताचा उल्लेख केलेला नाही. एक चकार शब्दही न काढता फक्त दहशतवादाचा निषेध माहिरा खानने केला आहे.
उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्शवभूमीवर माध्यम क्षेत्रातील आघाडीचा समूह असलेल्या ' झी' समूहाने ' जिंदगी' चॅनेलवरील पाकिस्तानी मालिकांवर बंदी टाकण्याचा निर्णय घेतला होता. ' हा निर्णय म्हणजे आपल्या देशावर सतत होणा-या दहशतवादी हल्ल्यांबदल निषेध नोंदवण्याचा एक प्रयत्न होता' असे 'झी' व ' एस्सेल' समूहाचे अध्यक्ष सुभाष चंद्र गोयल यांनी स्पष्ट केले होते. ' या (उरी) हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्याची विनंती आम्ही पाकिस्तानी कलाकारांना केली होती, मात्र असे करण्यास त्यांनी नकार दिला' असेही गोयल यांनी नमूद केले होते.