भारताच्या न भूतो, न भविष्यती अशा घवघवीत यशानंतर आता जपान देखील चंद्रावर जाण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. परंतू, खराब हवामानामुळे जपानला दोनदा रॉकेट लाँचिंग टाळावे लागले आहे. जपानच्या स्लिम लँडरच्या चंद्रमोहिमेवर आता जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
जपानने दुसऱ्या महायुद्धानंतर खूप मोठी प्रगती केली आहे. जपानची स्पेस एजन्सी जपान एयरोस्पेस एक्सप्लोरेशन एजेंसी (JAXA) ने आधी २६ ऑगस्टला रॉकेट लाँच करण्याचा प्रयत्न केला, परंतू खराब हवामानामुळे ते रद्द करण्यात आले. यानंतर २८ ऑगस्टलाही चंद्राच्या दिशेने झेपावण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही खराब हवामान आड आले आणि लाँचिंग टाळले गेले. आता तिसरी तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीय.
चंद्रयान ३ ने चंद्रावर ऑक्सिजन शोधला आहे. य़ाचसोबत सात-आठ मुलद्रव्ये देखील शोधली आहेत. जपानचा स्लिम लँडरवर आतापर्यंतच्या सर्व चंद्रमोहिमांपेक्षा अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. रडारने सज्ज असलेले स्लिम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविण्यात येणार आहे.
कोणत्याही चंद्र मोहिमेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिन पॉइंट लँडिंग मानली जाते. जुन्या मोहिमांमध्ये, असे मानले जाते की जिथे चांगली जागा असेल तिथे लँडिंग केले पाहिजे. स्लिमबद्दल असे बोलले जात आहे की तो त्याला पाहिजे तिथे लँड करणार आहे. हवामानात सुधारणा होताच स्लिम लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. ते तीन ते चार महिने कक्षेत फिरेल. यानंतर ते उतरेल. ते तेथे सुमारे 6 महिने कार्यरत राहू शकते आणि या काळात ते आपल्या कमांड सेंटरला सतत चित्रे पाठवत राहील.