ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा सत्तानाट्य सुरू झालं आहे. पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेऊन अवघे ४५ दिवस झालेले असताना लिझ ट्रूस (Liz Truss) यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. खुद्द लिझ ट्रूझ यांनीच याबाबतची घोषणा पत्रकार परिषद घेऊन केली आहे. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान निवडीचं राजकीय चढाओढ निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमिवर आता भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
कर कपात धोरणाने ब्रिटनमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे लिझ ट्रूस संकटात सापडल्या होत्या. या धोरणामुळे देशाच्या पेन्शन फंडाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांना यू-टर्न घ्यावा लागला होता.
ट्रूस यांनी ब्रिटनची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे त्यांचा कंझर्व्हेटिव्ह पक्ष फुटला होता. त्यांनी ४५ दिवसांपूर्वीच पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारला होता.
लिझ ट्रूस यांच्या राजीनाम्यामुळे सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाला मोठा धक्का बसला आहे. २०१६ साली ब्रेक्झिटचा निर्णय घेतला होता.ब्रेक्झिटमुळे ब्रिटनच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नव्या पंतप्रधानांची निवड आता एका आठवड्यात निवडले जाणार आहेत.
कंझर्वेटिव्ह नेते जेरेमी हंट यांनी आधीच मी इच्छुक नसल्याचे जाहीर केले. या राजकीय उलथापालथीच्या काळात फक्त ऋषी सुनक यांचेच नाव पंतप्रधानपदासाठी समोर येत आहे. गेल्या निवडणुकीत ट्रूस यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान भारतीय वंशाचे असतील अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.