गेल्या काही काळापासून आशियामध्ये मोठ्या घडामोडी घडत आहेत. छोटे छोटे देश चीनच्या आर्थिक ओझ्याखाली दबू लागले असून या देशांवरील भारताचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात झाली आहे. मालदीवमध्ये चीन समर्थकाचे सरकार आल्यानंतर आता श्रीलंकेतही चीन समर्थक सत्तेत आला आहे.
श्रीलंकेत मार्क्सवादी नेता अनुरा दिसानायके यांनी राष्ट्रपती निवडणूक जिंकली आहे. श्रीलंकेच्या इतिहासात पहिल्यांदाच पहिल्या फेरीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त मते एका उमेदवाराला न पडल्याने मतमोजणीची दुसरी फेरी घेण्यात आली आहे. यामध्ये दिसानायके यांचा विजय झाला आहे. पहिल्यांदाच डाव्या विचारसरणीचा नेता सत्तेवर आला आहे.
दिसानायके यांनी नमल राजपाक्षे, साजिद प्रेमदासा आणि विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांचा दारुण पराभव केला आहे. एका मजुराचा मुलगा देशाच्या राष्ट्रपतीपदी विराजमान होणार आहे. जनता विमुक्ति पेरामुना या पक्षाने दणक्यात सत्ता काबीज केली आहे. या पक्षाने नॅशनर पिपल्स पॉवर या पक्षासोबत आघाडी केली होती.
दिसानायके यांचा जन्म श्रीलंकेची राजधानी कोलंबोपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या थम्बुटेगामा येथे एका रोजंदारी मजुराच्या घरी झाला. दिसानायके हे त्यांच्या गावातून विद्यापीठात शिक्षणासाठी जाणारे पहिले व्यक्ती होते. पेरादेनिया विद्यापीठात प्रवेश घेतला खरा परंतू त्यांना राजकीय विचारांमुळे धमक्या मिळू लागल्या. यामुळे त्यांनी विद्यापीठ बदलून केलनिया विद्यापीठात प्रवेश घेतला. 80 च्या दशकात विद्यार्थी राजकारणाला सुरुवात केली. 1987 ते 1989 दरम्यान सरकारविरोधी आंदोलनादरम्यान ते जनता विमुक्ति पेरामुना या पक्षात आले आणि आज थेट राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचले.