पंतप्रधान कॅनडाहून रवाना : फ्रान्स, जर्मनीशी द्विपक्षीय वाटाघाटीव्हॅन्कूव्हर : फ्रान्स, जर्मनी व कॅनडा या तीन देशांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मायदेशी रवाना झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सशी ३६ राफेल विमानांच्या पुरवठ्याचा, तर कॅनडाशी युरेनियम पुरवठा करारासह इतर महत्त्वपूर्ण करार करण्यात आले. मायदेशी रवाना होण्यापूर्वी मोदींनी टिष्ट्वट केले, ‘आत्यंतिक समाधानाने मी कॅनडातून परतत आहे. दौरा भारत-कॅनडा संबंधांना आणखी बळकटी देईल. कॅनडावासीयांचे खूप खूप आभार. पंतप्रधान हार्पर यांचे विशेष आभार. ते खूपच चांगले व्यक्ती आणि अत्यंत निकटचे मित्र आहेत.’मोदी यांचे विमान इंधन भरण्यासाठी फ्रँकफर्ट येथे काही काळ थांबणार आहे. मोदी यांच्या या दौऱ्यात ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत भारताच्या विकासासाठी गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आकर्षित करण्यावर विशेष भर राहिला. मोदींच्या नऊदिवसीय दौऱ्याचा पहिला टप्पा फ्रान्स होता. पॅरिसमध्ये आपल्या दौऱ्यादरम्यान मोदींनी राष्ट्राध्यक्ष फ्रास्व ओलोंद व उद्योग जगतातील धुरिणांच्या गाठीभेटी घेतल्या. (वृत्तसंस्था)यादरम्यान त्यांनी फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार केला. याशिवाय महाराष्ट्राच्या जैतापूर येथील बंद पडलेला अणुप्रकल्प पुढे नेण्याचा निर्णयही घेतला. फ्रान्सनंतर मोदी जर्मनीला गेले. मोदींच्या दौऱ्याचा अंतिम टप्पा कॅनडाचा होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी कॅनडाशी २५ कोटी ४० लाख डॉलरचा पंचवार्षिक युरेनियम पुरवठा करार केला. ११ महिन्यांत १५ देशांना भेट नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत तब्बल १५ देशांना भेटी दिल्या आहेत. शेजारी नेपाळला त्यांनी दोन वेळा भेटी दिल्या. मोदी पुढील महिन्यात चीन, मंगोलिया आणि दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.हिंदुत्व हा धर्म नसून जीवनशैली -मोदी४पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्यासह गुरुद्वारा व एका मंदिरास शुक्रवारी भेट दिली. यावेळी त्यांनी हिंदुत्व हा धर्म नाही तर जीवनशैली असल्याचे म्हटले. मोदी म्हणाले की, भारतात सर्वोच्च न्यायालयाने हिंदू धर्माची खूपच सुंदर व्याख्या केली आहे. हिंदू हा धर्म नसून ती एक जीवनशैली आहे, असे या न्यायालयाने म्हटले आहे. मला वाटते ही व्याख्या योग्य आहे. हिंदू धर्माने शास्त्रीय जीवनपद्धतीद्वारे वन्यजीवांसह निसर्गाच्या लाभासाठी काम केले आहे.
नऊ दिवस, तीन देशांच्या दौऱ्यानंतर मोदी मायदेशी
By admin | Published: April 18, 2015 12:16 AM