ऑनलाइन टीम
लीमा, दि. ८ - पेरु येथे स्कायडायविंग करताना पॅराशूट न उघडल्याने ५००० हजार फूटांवरुन पडूनही एक तरुण आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. विशेष बाब म्हणजे या तरुणाला साधे फ्रॅक्चरही न झाल्याने डॉक्टरही अचंबित झाले आहेत.
पेरु हवाई दलात कार्यरत असलेल्या अमासीफ्यूअन गॅमारा ( वय ३१) या जवानाचे स्कायडायविंगचे प्रशिक्षण सुरु होते. दोन दिवसांपूर्वी एका विशेष विमानातून गॅमाराने पाच हजार फुटांवरुन उडी मारली. हवेत त्याने पॅराशूट उघडण्याचा प्रयत्नही केला. मात्र काही केल्या पॅराशूट उघडत नव्हते. या सर्व गोंधळात गॅमारा बेशूध्द झाला व तो थेट जमिनीवर येऊन पडला.
गॅमाराने डोळे उघडले तेव्हा तो रुग्णालयात उपचार घेत होता. एवढ्या उंचावरुन पडूनही गॅमारा जीवंत असणे हा एक चमत्कारच आहे असे गॅमारावर उपचार करणा-या डॉक्टरांनी सांगितले. गॅमाराला सध्या रुग्णालयात वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून अंतर्गत दुखापत झाली आहे का हे पाहण्यासाठी विविध तपासण्याही सुरु आहेत.