वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाची मुदत संपल्यानंतर बराक ओबामा कुठे राहायला जाणार याची उत्सुकता संपली आहे. स्वत: ओबामा यांनी मी आणि माझे कुटुंब वॉशिंग्टन डी.सी.मध्येच राहणार आहोत. कारण आमची मोठी मुलगी साशा हिला तिचे शाळेचे शिक्षण पूर्ण करता येईल, असे सांगितले. ओबामा हे वॉशिंग्टन डी.सी.च्या जवळ असलेल्या कॅलोरामा येथे ८,२०० चौरस फुटांचा बंगला भाडेपट्ट्यावर घेतील, असे वृत्त ‘पोलिटिको’ने दिले. हा बंगला नऊ बेडरूम्सचा व आठ बाथरूम्सचा असून त्याचे बांधकाम १९२८ मध्ये झालेले आहे. त्याची शेवटची विक्री २०१४ मध्ये ५.३ दशलक्ष डॉलरमध्ये झाली होती, असे रेडफिन डाटाने म्हटले. आज या निवासस्थानाची किमत अंदाजे ६.३ दशलक्ष डॉलर आहे. हे नवे निवासस्थान व्हाइट हाऊसपासून अवघ्या अडीच मैलांवर आहे, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले. शिकागोमध्ये ओबामा यांचे निवासस्थान असले तरी त्यांना साशाचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत वॉशिंग्टन डी.सी.मध्येच राहायचे आहे.
निवृत्तीनंतर ओबामा राहणार वॉशिंग्टनमध्येच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2016 12:27 AM