काठमांडू - राजकीय अस्थिरतेचा सामना करणा-या नेपाळमध्ये पुन्हा एकदा सात महिन्यात पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. शेर बहाद्दूर देबुआ यांनी नेपाळच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. खडगा प्रसाद ओली त्यांची जागा घेणार आहेत. शेर बहाद्दूर देबुआ नेपाळचे 40 वे पंतप्रधान होते. ओली यांचा लवकरच शपथविधी होईल.
मागच्यावर्षी मे महिन्यात पुष्पा कमल दहल म्हणजे प्रचंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी शेर बहाद्दूर देबुआ यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारला होता. अवघ्या नऊ महिन्यात त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. ते नेपाळचे 39 वे पंतप्रधान होते.दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांनाही भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पदावरुन पायउतार व्हावे लागले आहे.
देबुआ यांच्या राजीनाम्यामुळे डाव्या आघाडीचा नेपाळमध्ये सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नेपाळच्या संसदीय आणि स्थानिक निवडणुकीत देबुआ यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. सीपीएनच्या पाठिंब्याने देबुआ नेपाळचे पंतप्रधान झाले होते. माझ्या नेतृत्वाखाली देशात निवडणुका यशस्वीपणे पार पडल्याचे त्यांनी टीव्हीवरील संदेशात म्हटले.
डाव्या आघाडीने राष्ट्राध्यक्षांकडे नव्या सरकारच्या स्थापनेचा दावा केला आहे. युएमएलचे अध्यक्ष केपी शर्मा ओली नेपाळचे पुढचे पंतप्रधान असतील. ओली नेतृत्व करत असलेल्या सीपीएन-युएमएल आणि प्रचंड नेतृत्व करत असलेल्या सीपीएन-माओइस्ट आघाडीने डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत संसदेतील 275 पैकी 174 जागा जिंकल्या. निदान आता तरी नेपाळमध्ये स्थिर सरकार सत्तेवर येईल अशी सर्वांना अपेक्षा आहे.