इस्लामाबाद, दि. 8 - 2008 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हाफिज सईदची संघटना 'जमात-उद-दावा'ने राजकारणात प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे. हाफिज सईदच्या या राजकीय पक्षाला 'मिल्ली मुस्लिम लीग' असं नाव देण्यात आलं आहे. 'जमात-उद-दावा'चा वरिष्ठ सदस्य सैफुल्लाह खालिद याची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सोमवारी इस्लामाबादमध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचं नाव, लोगो आणि झेंडा जाहीर करण्यात आलं.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सैफुल्लाह याने सांगितलं की, 'पाकिस्तानला एक इस्लामिक देश बनवण्याचा मिल्ली मुस्लिम लीग प्रयत्न केलं. तसंच त्याच्या कल्याणासाठी काम करेल'. समान विचारसरणी असणा-या पक्षांसोबत काम करण्यास आपण तयार असल्याचंही सैफुल्लाह बोलला आहे. मात्र 'जमात-उद-दावा'चा प्रमुख हाफिज सईदची पक्षामध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे, हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
पाकिस्तानात सध्या राजकीय भूकंप आला असून नेमकी हीच संधी साधत हाफिज सईदने राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. पनामागेट प्रकरणी नवाज शरिफ यांना आपलं पंतप्रधानपद सोडावं लागलं. अशा परिस्थितीत आपल्यासाठी राजकारणात प्रवेश करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं हाफिज सईदला वाटत आहे. पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयमध्ये असलेल्या आपल्या ओळखींचा फायदा घेत हाफिज सईद राजकारणातील प्रवेशात कोणताही अडथळा येणार नाही यासाठी प्रयत्न करत आहे.
विशेष म्हणजे हाफिज सईद गेल्या सहा महिन्यांपासून नजरकैदेत आहेत. पंजाब सरकारने 31 जानेवारी रोजी हाफिज सईद आणि त्याचे जवळचे चार साथीदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इकबाल, अब्दुल रहमान आबिद आणि काजी आसिफ हुसैन यांना दहशतवाद विरोधी कायद्यांतर्गत ताब्यात घेतलं होतं. 'जमात-उद-दावा' विरोधात कोणतीच कारवाई केली नाही तर पाकिस्तानवर बंदी येऊ शकते अशी धमकीच अमेरिकेने दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्यात अजून दोन महिन्यांसाठी कैदेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हाफिज सईद मुंबईत झालेल्या 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. भारताने नेहमीच त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुंबईत झालेल्या या भीषण दहशतवादी हल्ल्यात 160 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.