बँकॉक: थायलंडच्याखासदारांनी देशाचे माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांची सर्वांत लहान मुलगी पैतोंगतार्न शिनावात्रा यांची देशाच्या नवीन पंतप्रधान म्हणून शुक्रवारी निवड केली. पैतोंगतार्न या शिनावात्रा परिवारीतील थायलंडचे नेतृत्व करणाऱ्या तिसऱ्या व्यक्ती आहेत. यापूर्वी पैतोंगतार्न यांचे वडील थाकसिन शिनावात्रा व आत्या यिंगलुक शिनावात्रा या दोघांनी पंतप्रधानपदाचा पदभार संभाळला आहे. पैतोंगतार्न या आपल्या आत्यानंतर थायलंडच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान झाल्या आहेत.
- पैतोंगतार्न ठरल्या सर्वांत तरुण पंतप्रधान
पैतोंगतार्न या देशातील सर्वांत तरुण पंतप्रधान असून, त्यांचे वय ३७ वर्षे आहे. त्या सत्ताधारी पक्ष ‘फेउ थाई'च्या नेत्या आहेत. असे असले तरी त्या निवडून आलेल्या खासदार नाहीत. देशाच्या पंतप्रधान होण्यासाठी संसद सदस्य असणे आवश्यक आहे. मात्र, संसदेत बहुमत मिळविणाऱ्या पैतांगतार्न या एकमेव नेत्या आहेत.
- वडील, आत्याला हटविले हाेते
पैतोंगतार्न यांचे वडील थाकसिन यांची सत्ता २००६ मध्ये लष्कराने उलथाविली हाेती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आराेप करण्यात आले हाेते. त्यानंतर त्यांनी देश साेडला. पुढे त्यांनी बहिण यिंगलुक यांना पुढे केले. त्या २०११मध्ये पंतप्रधान झाल्या. बहिणीच्या आड थाकसिन हेच सरकार चालवित असल्याचा आराेप करण्यात आला हाेता.
- माजी पंतप्रधानांची हकालपट्टी
दोन दिवसांपूर्वी संवैधानिक न्यायालयाने नैतिकतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी यापूर्वीचे पंतप्रधान श्रेथा थाविसिन यांना पदावरून हटविले होते. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका वकिलाला त्यांनी मंत्रिमंडळात स्थान दिले हाेते.