Israel Hamas War, USA vs Iran: इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत आखाती देशांमध्ये तणाव वाढत आहे. एकीकडे यूएईसारखे इस्रायल समर्थक देश आहेत तर दुसरीकडे इराण आणि सीरियासारखे देश हमासच्या पाठीशी उघडपणे उभे राहिलेले दिसतात. इराणचे परराष्ट्र मंत्री हुसेन अमीर यांनी धमकी दिली आहे की जर इस्रायली सैन्याने गाझामध्ये प्रवेश केला तर इतर आघाड्या देखील त्यांच्यावर चाल करून जाण्याची शक्यता आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री लेबनॉनमधून इस्रायलवर हल्ला करणाऱ्या हिजबुल्लाचा संदर्भ देत होते. इराणने म्हटले आहे की, इस्रायली सैन्याने प्रवेश केल्यास हमासचे नेते गाझाची स्मशानभूमी करतील. या दरम्यान, अमेरिकेने आखाती देशांमध्ये दोन अति-विध्वंसक आण्विक विमानवाहू जहाजे तैनात केली आहेत आणि जो बायडेन यांनी इराणला खुला इशारा दिला आहे. त्यामुळे हमासनंतर इराण अमेरिका आणि इस्रायलचे लक्ष्य बनू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
इराणी लोकांचा असा विश्वास आहे की अमेरिका नजीकच्या भविष्यकाळात इराणवर हल्ला करेल. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू अनेकदा इराणला गुन्हेगार ठरवताना दिसतात आणि संपवण्याची धमकी देतात. अमेरिकेने मदत केली नाही तर इस्रायल एकहाती इराणचा आण्विक तळ उद्ध्वस्त करेल, असेही नेतान्याहू यांनी म्हटले होते, असे आखाती देशांच्या राजकारणावर बारीक लक्ष ठेवणारे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ कमर आगा यांनी सांगितले. तसेच आगा म्हणाले की, हमासच्या संकटापूर्वीच अमेरिकेने इराणजवळील पर्शियन गल्फमध्ये मोठ्या प्रमाणावर सैन्य आणि युद्धनौका तैनात केल्या होत्या.
हमासच्या हल्ल्यापूर्वी बायडनने एक विधान केले होते, ज्यात त्यांनी म्हटले होते की, इराण १५ दिवसांत अणुबॉम्ब बनवू शकतो. इराण अणुबॉम्ब बनवत आहे. इराणला अणुबॉम्ब बनवू देणार नाही असे अमेरिकेने आधीच जाहीर केले आहे. अशा स्थितीत अमेरिका इराणचा आण्विक तळ उद्ध्वस्त करणार की काय, या विषयावर चर्चा सुरू आहेत. यानंतर अमेरिकेने इस्रायलसह इराणचा आण्विक तळ नष्ट करण्याचा युद्धसरावही केल्याची माहिती आहे. हे सर्व हमासच्या हल्ल्यापूर्वी घडले. इराण आणि अमेरिका दोघेही युद्धासाठी पूर्णपणे तयार आहेत. त्यामुळेच इराणला आता भीती आहे की कधीतरी इस्रायल आणि अमेरिका आपल्यावर नक्कीच हल्ला करू शकतील, असेही ते म्हणाले.