टॉमेटोनंतर आता गहू भडकणार! काळ्या समुद्रातील रशियाच्या घोषणानंतर दर 8.2 टक्क्यांनी वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 04:04 PM2023-07-20T16:04:25+5:302023-07-20T16:13:42+5:30
रशियाने युक्रेनसोबतचा अन्न करार मोडला आहे. काळ्या समुद्रात युक्रेनला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अन्न धान्याची वाहतूक करणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्य़ाच्या समझोत्यापासून रशियाने स्वत:ला बाजुला केला आहे.
रशिया युक्रेन युद्धाने पुन्हा एकदा जगाला धडकी भरविली आहे. रशियाने काळ्या समुद्रावरून मोठा इशारा दिला आहे. यामुळे जगभरात पुन्हा एकदा गव्हाचे दर वाढू लागले आहेत. युक्रेनच्या बंदराकडे जाणाऱ्या जहाजांना रशिया लष्करी जहाजे समजेल आणि कारवाई करेल अशी धमकी पुतीन सरकारने दिली आहे.
रशियाने युक्रेनसोबतचा अन्न करार मोडला आहे. काळ्या समुद्रात युक्रेनला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अन्न धान्याची वाहतूक करणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्य़ाच्या समझोत्यापासून रशियाने स्वत:ला बाजुला केला आहे. यावरून रशिया आता मालवाहक जहाजांना लक्ष्य करण्याचा प्लॅन करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. ज्या देशांचे ध्वज त्या जहाजांवर असतील ते युक्रेन संघर्षातील विरोधी पक्ष म्हणून पाहिले जाणार असल्याचे रशियाने म्हटले आहे.
पुतीन यांनी मागण्या मान्य झाल्यास ते तात्काळ धान्य करारावर परततील, अशी अट ठेवली आहे. रशियाची कृषी बँक जागतिक देयक प्रणालीशी जोडली गेली पाहिजे, असे पुतीन म्हणाले आहेत. रशियाच्या या घोषणेनंतर युरोपीय शेअर बाजारातील गव्हाच्या किमतीत एकाच दिवसात 8.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय मक्याचे भावही ५.४ टक्क्यांनी वाढले आहेत. युक्रेन हा गव्हाचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे.
रशियन हल्ल्यात 60,000 टन धान्य नष्ट झाले आहे. याशिवाय गव्हाच्या निर्यातीसाठीच्या पायाभूत सुविधाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. असे असताना रशियाने ही घोषणा करताच युक्रेनियन बंदरांवर हल्ले चढविले आहेत. जर करार पुन्हा सुरु झाला नाही तर त्याचे भारतासह ऑफ्रिकन देशांवर गंभीर परिणाम होणार असल्याचा इशारा युक्रेनचे कृषी मंत्री मायकोला सोल्स्की यांनी दिला आहे.