ऑनलाइन लोकमत
कॅलिफोर्निया, दि. १३ : जर तुम्हाला पर्यटन स्थळाचे फोटो काढत बसल्यास सहलीची मजा घेता येणार नाही किंवा तुमचे अनुभव कॅमेरात टिपतच बसलो तर त्यांचा अधिक आनंद लुटता येणार नाही असे वाटत असेल तर पुन्हा विचार करा ! कारण नुकत्याच केलेल्या नवीन संशोधनाद्वारे जे लोक आपल्या अनुभवांचे तसेच तसेच आपल्या महत्त्वपूर्ण घटनांचे क्षण फोटोत टिपतात ते त्यांचा जास्त आनंद घेतात हे एका सर्वेक्षणात समोर आले आहे.
युनिवर्सिटी ऑफ साऊदर्न कॅलिफोर्निया, येले युनिवर्सिटी आणि युनिवर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियामधील मानसशास्त्रज्ञांनी संयुक्तपणे अशाप्रकारातील पहिलेच संशोधन केले आहे.छायाचित्रण कला आणि त्याचा लोकांवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी या मानसशास्त्रज्ञांनी दोन हजारांहून जास्त लोकांच्या जवळपास नऊ चाचण्या घेतल्या. त्यानंतर अधिक माहितीसाठी त्यांचे सर्वेक्षण घेण्यात आले. या सर्वेक्षणात ज्यांनी आपल्या अनुभवांचे छायाचित्रण केले आहे अशा जवळपास सर्वांनीच छायाचित्र न काढलेल्यांपेक्षा जास्त आनंद उपभोगल्याचे समोर आले आहे.या संशोधनात सहभागी व्यक्तींना एक संग्रहालयातील प्रदर्शनाचा स्वमार्गदर्शक दौरा घेण्यास सांगितले आणि त्यांच्या डोळा हालचाली टिपण्यासाठी एक चष्मा परिधान करायला दिला. संशोधकांना प्रदर्शनात छायाचित्र काढलेल्या व्यक्ती या प्रदर्शन केवळ बघणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त आनंदी दिसून आल्या. अशा व्यक्ती या अनुभवांत किंवा एखाद्या घटनेत जास्त गुंततात असेही संशोधकांचे म्हणणे आहे. तर मोठे कॅमेरे आणि त्याची साधने घेऊन फोटो काढणे हे लोकांना गैरसोयीचे वाटत असल्याचे तसेच मोबाईलने छायाचित्र काढणे सोपे जात असल्याचेही समोर आले आहे.