जाकार्ता - इंडोनेशियामधील नैसर्गित आपत्तींची मालिका अद्याप कायम असून, त्सुनामी आणि भूकंपामध्ये झालेल्या विनाशानंतर आता देशाला ज्वालामुखीच्या उद्रेकाचा सामना करावा लागला आहे. इंडोनेशियातील उत्तर सुलावेसीमधील माऊंट सोपुतन या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून, त्यामुळे स्थानिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आठवडाभरामध्ये त्सुनामी आणि भूकंपामुळे इंडोनेशियात हजारो लोक मारले गेले आहेत. त्या आपत्तीमधून इंडोनेशिया अद्याप सावरला नसतानाच उत्तर सुलावेसीमधील माऊंट सोपुतन ज्वालामुखी जागृत झाला आहे. या ज्वालामुखीमध्ये होत असलेल्या स्फोटामुळे त्सुनामी आणि भूकंप पीडितांसाठी चालवण्यात येत असलेल्या मदतकार्यामध्ये अडथळे येत आहेत. बुधवारी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला, अशी माहिती इंडोनेशियातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या छायाचित्रामधून ज्वालामुखीतील राखेचे लोट 4 हजार मीटर उंचीपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे. इंडोनेशियातील माऊंट सोपुतनच्या उत्तर पश्चिम भागात ज्वालामुखीमधून उठलेली राख दूरच्या प्रदेशातही पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्यातरी ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेमुळे देश आणि परदेशातील विमानसेवेवर परिणाम होण्याची शक्यता नाही, अशी माहिती बीएनपीडी या संस्थेने दिली आहे.