माले : मालदीवच्या संसदेत बहुमत असलेला प्रमुख विरोधी पक्ष एमडीपी, अध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्यावर महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे. मोइझ्झू यांच्या मंत्रिमंडळात तीन सदस्यांना घेण्यास सोमवारी संसदीय मतदानादरम्यान मंजुरी नाकारण्यात आली, असे वृत्त आहे.
चीन समर्थक राष्ट्राध्यक्षांच्या मंत्रिमंडळातील चार सदस्यांना मंजुरी देण्यावरून सरकार समर्थक खासदार आणि विरोधी खासदार यांच्यात रविवारी संसदेत संघर्ष सुरू झाल्यानंतर या घडामोडी घडल्या.
“एमडीपीने डेमोक्रॅट्सच्या सहकार्याने महाभियोग प्रस्तावासाठी पुरेशा स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. तथापि, त्यांनी तो अद्याप सादर केला नाही,” असे वृत्त एमडीपीमधील एका खासदाराचा हवाला देत सन डॉट कॉमने दिले आहे. सोमवारी झालेल्या एमडीपीच्या संसदीय गटाच्या बैठकीत महाभियोग प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.
सभापतींच्या कानात वाजविले हॉर्नरविवारी काही खासदारांनी हॉर्न आणले होते. काही खासदार स्पीकरच्या खुर्चीजवळ पोहोचले आणि त्यांच्या कानाजवळ वाजवू लागले. सभापती एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आरोप या खासदारांनी केला.यानंतर मुइझ्झूच्या समर्थक आणि विरोधक खासदारांमध्ये बाचाबाची झाली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.
महाभियोगासाठी काय करावे लागेल?- महाभियोगसाठी किमान ५३ मतांची आवश्यकता असेल. त्यानंतरच मुइझ्झू यांना हटवता येईल. त्यामुळे प्रस्ताव मंजूर करून घेणे सोपे नाही. - महाभियोगात तीन गोष्टी स्पष्ट असाव्यात. पहिली- राष्ट्रपतींनी इस्लाम, संविधान किंवा कायद्याच्या विरोधात काहीतरी केले आहे. दुसरे म्हणजे अध्यक्षपद भूषविताना त्यांनी त्याचा गैरवापर केला आहे किंवा स्वत:च्या फायद्यासाठी वापरला आहे. तिसरा आणि शेवटचा म्हणजे घटनेने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात अपयशी ठरले आहेत.