ब्राझील : आयुष्यात पहिल्यांदाच लग्नाचा विचार आला परंतु ते शक्य नसल्यामुळे १०६ वर्षांच्या वाल्दा यांनी ४० वर्षांनी लहान असलेल्या आपल्या बॉयफ्रेंडशी साखरपुडा केला. आता हे जोडपे खूपच आनंदी आहे. वाल्देमिरा रॉड्रिग्ज् डी ओलिव्हेएर उर्फ वाल्दा असे त्यांचे नाव असून त्यांच्या मित्राचे नाव अपॅरोसिदो डायस जॅकोब (६६) आहे. साखरपुड्याचा कार्यक्रम ११ फेब्रुवारी रोजी झाला. त्यात वाल्दा यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.जॅकोब व वाल्दा यांची भेट दक्षिणपूर्व ब्राझीलमधील वयोवृद्धांसाठीच्या वसतिगृहात झाली. जॅकोब म्हणाले की,‘‘वाल्दा यांना जेव्हा मी बघितले तेव्हाच मी त्यांच्या प्रेमात पडलो. माझ्याबद्दलही त्यांचे हेच मत आहे.’’ जॅकोब यांच्या डाव्या हाताला अर्धांगवायू झाला असला तरी वाल्दा यांना ती काही अडचण वाटली नाही. वाल्दा यांना वॉकर घेऊनच चालावे लागते तरीही जॅकोब हे त्यांच्या प्रेमात पडले. वाल्दा यांनी मला खऱ्या अर्थाने सुखी व समाधानी केले असल्यामुळे त्या माझ्यापेक्षा ४० वर्षांनी मोठ्या आहेत हा काही प्रश्न नाही, असे जॅकोब म्हणाले. १९ वर्षांपूर्वी जॅकोब या वसतिगृहात आले. त्याआधी ते बेरोजगार झाल्यामुळे ते बेघरही बनले होते. आम्हाला लग्न करायचे आहे, असे वाल्दा व जॅकोब यांनी प्रोजेक्ट आॅफ ड्रीम्सच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना तुम्हा दोघांनाही या वसतिगृहात राहता येणार नाही व वसतिगृहाबाहेर राहणे शक्य होणार नाही, असा सल्ला दिला होता. लग्नाऐवजी मग कार्यकर्त्यांनी याच वसतिगृहात साखरपुड्याचा कार्यक्रम आयोजित केला. वाल्दा या नवरीच्या गाऊनमध्ये आल्या होत्या. या जोडप्याने मग छानसा केक या कार्यक्रमानिमित्त कापला. या दोघांचे कधीही लग्न झालेले नव्हते त्यांना मुलबाळ काहीही नाही. वाल्दाचे बरेचसे नातेवाईक हयात नाहीत. अगदीच मोजके जिवंत असून जॅकोबचा त्याच्या कुटुंबियांशी काहीही संबंध नाही. तरीही या कार्यक्रमाला १५० वऱ्हाडी उपस्थित होते.
१०६ व्या वर्षी ६६ वर्षांच्या बॉयफ्रेंडशी साखरपुडा
By admin | Published: February 16, 2017 12:41 AM