Sheikh Hasina Cases, Bangladesh Violence: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या माजी कॅबिनेट मंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याचा सिलसिला सुरुच आहे. आता त्यांच्यावर हत्येचे ५ नवीन गुन्हे दाखल झाले आहेत. बांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ५ मृत्युंबाबात खुनाच्या गुन्ह्यांसह शेख हसीना आणि त्यांच्या साथीदारांवर एकूण ८९ गुन्हे दाखल झाले आहेत.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्ध हे खटले ढाका येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यासह पक्षाचे सरचिटणीस ओबेदुल कादर आणि अन्य ३३९ जणांची नावेही या प्रकरणांमध्ये आहेत. यापैकी काहींविरुद्ध पीडितांच्या नातेवाईकांनी सोमवारी ढाका येथील विविध महानगर दंडाधिकारी न्यायालयात खटले दाखल केले आहेत. बांगलादेशातील विद्यार्थ्यांचे हे आंदोलन जुलैमध्ये सुरू झाले. त्यासंदर्भात अनेक खटले आहेत.
६००हून अधिक लोकांचा मृत्यू
विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मृतांचा आकडा ६००च्या पुढे गेला आहे. निदर्शने उग्र झाल्यानंतर, शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अवामी लीग पक्षाचे सरकार ५ ऑगस्ट रोजी सत्तेवरून हटवण्यात आले. आता बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार कार्यरत आहे.
शेख हसीना यांचा पासपोर्ट रद्द
शेख हसीना अनेक वर्षे बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या. त्या बांगलादेशातून पळून भारतात आल्या. त्या अजूनही भारतातच आहेत. बांगलादेशने त्यांचा राजकीय पासपोर्ट रद्द केला आहे. म्हणजेच त्या ज्या पासपोर्टसह भारतात आल्या होत्या, तो आता वैध नाही. त्यामुळे आता शेख हसीना काय करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे.