तेहरान : भारताने सोमवारी इराणसोबत सैनिकी डावपेचांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणारा चबाहर बंदर करार केला. या करारामुळे भारताला पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तान आणि युरोपमध्ये प्रवेश करता येईल. उभय देशांनी एकत्रितपणे दहशतवादाशी लढण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याचेही मान्य केले. चबाहर बंदराचा विकास करण्यासाठी भारत ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. माल वाहतुकीसाठी भारत, इराण आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिपक्षीय करारही झाला. या करारामुळे इतिहासाची गती बदलणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी म्हटले. इराणशी द्विपक्षीय करार व्हायच्या आधी मोदी आणि इराणचे अध्यक्ष हसन रौहानी यांच्यात तपशिलाने चर्चा झाली. अॅल्युमिनियम प्लांट उभारणे आणि भारताला अफगाणिस्तान आणि मध्य अशियात प्रवेश करता यावा यासाठी रेल्वेमार्ग तयार करण्यावरही चर्चा झाली. इराणशी करार करण्याचा हेतू हा अर्थ, व्यापार, वाहतूक, बंदर विकास, संस्कृती, विज्ञान आणि शैक्षणिक सहकार्य या क्षेत्रांत अधिक सहकार्य वाढविण्याचा आहे. गेल्या १५ वर्षांत भारताच्या पंतप्रधानांनी प्रथमच इराणला भेट दिली आहे. इराणच्या दक्षिणेकडील चबाहर बंदर विकसित करण्यासाठीच्या पहिल्या टप्प्याचे कंत्राट भारताला या कराराने मिळाले. चबाहर बंदर सिस्टॅन-बलुचिस्तान प्रांतात आहे. या बंदराला भारताच्या पश्चिम किनाऱ्याकडून सहजपणे जाता येते व या मार्गाने पाकिस्तानलाही टाळता येते.
चबाहर बंदर विकासासाठी इराणसोबत करार
By admin | Published: May 24, 2016 12:49 AM