लोकमत न्यूज नेटवर्कदुबई : आंतरराष्टÑीय बाजारात खनिज तेलाच्या घसरणाऱ्या किमती रोखण्यासाठी तेल निर्यातदार देशांची संघटना (ओपेक) आणि रशिया यांच्या दरम्यान सहमती झाली आहे. मात्र मेक्सिकोने उत्पादनात कपात करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. आता दररोज दहा दशलक्ष पिंपांचे उत्पादन कमी केले जाणार असून, ही कपात जुलै महिन्यापर्यंत लागू राहणार आहे.तेल निर्यातदार देशांची संघटना (ओपेक)चे सदस्य तसेच अन्य तेल उत्पादक देश यांच्या दरम्यान तेलाचे उत्पादन कमी करण्याबाबत गुरुवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा सुरू होती.शुक्रवारी सकाळपर्यंत प्रदीर्घ काळ चाललेल्या या चर्चेतून उत्पादन कपातीबाबत समाधानकारक तोडगा निघाला. यामध्ये दररोज दहा दशलक्ष पिंपांची निर्मिती कमी केली जाणार असून, ही कपात जुलै महिन्यापर्यंत लागू राहणार आहे. जुलैनंतर दोन दशलक्ष पिंपांचे उत्पादन वाढविले जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.जगभरात कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे लॉकडाउन सुरू असताना खनिज तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र उत्पादनात कपात झाली नसल्याने खनिज तेलाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झालेले दिसून आले. त्यामुळे उत्पादनात कपात करण्यासाठी उत्पादक देशांच्या तेलमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. या चर्चेतून मेक्सिकोने सभात्याग केला. तसेच उत्पादन कमी करण्यास नकार दिला आहे.व्हिडीओ कॉन्फरन्सिंगपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्टÑाध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि सौदीचे राजे सलमान यांच्याशी चर्चा केली. गेल्या काही दिवसांपासून सौदी अरेबिया आणि रशियादरम्यान खनिज तेलाच्या उत्पादनावरून तू-तु मै-मै सुरू होती. या पार्श्वभूमीवर ही चर्चा होऊन हे दोन्ही देश उत्पादन कपातीसाठी राजी झाले.
तेल उत्पादनात कपात करण्याबाबत सहमती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 5:21 AM