पॅरिस : पृथ्वीसमोर येत असलेल्या धोक्यांमध्ये हवामान बदल, युद्ध यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हा एक नवीन धोका निर्माण झाला आहे. एएक्सएच्या फ्युचर रिस्क रिपोर्ट २०२३ नुसार, एआय ही जगातील चौथी सर्वांत मोठी चिंता बनली आहे. अत्यंत वेगाने प्रगत होत असलेल्या एआयच्या विकासामुळे धोका दिवसेंदिवस वाढत आहे. जागतिक स्तरावर बहुतांश तज्ज्ञ (६४%) आणि नागरिक (७०%) म्हणतात की एआयमधील संशोधन थांबविण्याची गरज आहे. एआयमुळे मानवाला धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज आहे. एआयमुळे कुणाचीही प्रतिमा बदलून त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सर्वांत मोठा धोका कोणता? हवामान बदल हा सर्वांत मोठा धोका मानला आहे. ही समस्या जगभरात धोका मानली जात आहे. केवळ १५% तज्ज्ञांना वाटते की, स्थानिक प्रशासन त्यास सामोरे जाण्यास तयार आहे. सायबर सुरक्षा धोके जागतिक देशांसाठी चिंतेचे कारण आहेत. यामध्ये ‘सायबर युद्धा’चाही समावेश आहे.
कुणामुळे वाढली असुरक्षितता? ५० देशांतील ३,५०० तज्ज्ञ आणि १५ राष्ट्रांतील २०,००० सामान्य लोकांच्या सर्वेक्षणानुसार, लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना कायम आहे. ग्लोबल वार्मिंग, प्रदूषण आणि हानिकारक पदार्थांचा संपर्क यासारख्या घटकांमुळे लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.
- ७५% तज्ज्ञांना वाटते की, अधिकतर धोके एकमेकांशी जोडलेले आहेत.
- ६०% जणांना वाटते की, सामाजिक प्रगती करण्यासाठी रिस्क घेणे आवश्यक
-६८% लोक रोज सायबर सुरक्षेसंबंधी चिंता व्यक्त करतात.