अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मायदेशी आणण्यासाठी पाठवण्यात आलेलं एअर इंडियाचं विमान (Air India) रविवारी रात्री सुरक्षित दिल्ली विमानतळावर पोहोचलं. अफगाणिस्तानमधील बहुतांश भागांवर पुन्हा एकदा तालिबाननं नियंत्रण मिळवलं आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही देश सोडला आहे. अशा परिस्थितीत एअर इंडियाचं विमानन AI244 हे प्रवाशांना घेऊन भारतात परतलं आहे.
उड्डाणं रद्द करण्याची कोणतीही योजना नसल्याची माहिती एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसंच सोमवारीदेखील विमान उड्डाण घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या केवळ एअर इंडिया ही एकमेव विमान कंपनी भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान सुरू आहे. विमानानं रविवारी दुपारी ४० प्रवाशांसह दिल्लीहून काबुलसाठी उड्डाण घेतलं होतं, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. दुपारी जवळपास १२.४५ मिनिटांनी AI243 हे विमान दिल्लीहून रवाना झालं. परंतु काबुल विमानतळाजवळ हवेत जवळपास एक तास चक्कर मारावी लागली, कारण उतरण्यासाठी एटीसीक़डून परवानगी मिळत नव्हती असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
दरम्यान, विमानाला उतरण्यास विलंब करण्यामागचं कारण काय होतं हे स्पष्ट नसल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर AI 244 हे विमान भारतीय वेळेनुसार जवळपास संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास काबुलवरून रवाना करण्यात आलं. सध्या कंपनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि आवश्यकतेनुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
लोकांसोबत गद्दारी"जेव्हा मी त्या ठिकाणाहून पळालो आहे तेव्हा तुम्ही तिकडची परिस्थिती काय आहे हे समजू शकता. अशरफ गनी याची टीम गद्दार आहे. त्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांसोबत गद्दारी केली आहे. लोक त्यांना माफ करणार नाहीत," अशी प्रतिक्रिया अफगाणिस्तानचे माजी खासदार जमील करझई यांनी दिल्लीला पोहोचल्यानंतर दिली.