सिडनी : एअर इंडियाच्या विमानातील एक कर्मचारी कोरोना विषाणूच्या चाचणीत सकारात्मक निघाल्यामुळे ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांनी प्रवासी घेण्यास त्याला नकार दिल्यावर सिडनीहून एअर इंडियाचे विमान मंगळवारी कर्मचारी व माल घेऊन परतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत शनिवारी दिल्ली-सिडनी प्रवासाच्या विमानातील सर्व कर्मचाऱ्यांची आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक आली होती.
रविवारी सकाळी विमान सिडनीत आल्यावर ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी सगळ्या कर्मचाऱ्यांची पुन्हा आरटी-पीसीआर चाचणी केली. तिचे अहवाल सोमवारी मिळाले. त्यातील एक कर्मचारी चाचणीत सकारात्मक निघाला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी सिडनी-दिल्ली प्रवासासाठी प्रवाशांना घेण्यास नकार दिला. त्यामुळे सोमवारी सिडनीहून विमान फक्त कर्मचारी आणि माल घेऊन आले, असे सूत्रांनी सांगितले. चाचणीत सकारात्मक आलेल्या कर्मचाऱ्याला सिडनीत विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.