दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या पाकिस्तानविरोधात गेली अनेक वर्षे भारत जगाला ओरडून सांगत आला आहे. याच पाकिस्तानवर नुकताच इराणने एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले आहेत. यामुळे खवळलेल्या पाकिस्तानने देखील पलटवार करत इराणमधीलदहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केल्याचा दावा केला आहे. तसेच इराणच्या सीमेवरील इराणी अधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आहे.
पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी इराणच्या सैन्याला लक्ष्य केले आहे. तेथील वृत्तसंस्था आयएरएनएनुसार इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या एका अधिकाऱ्याची पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला लागून असलेल्या इराणच्या अशांत परिसरात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे.
पाकिस्तानच्या अशांत बलुचिस्तान प्रांतातील जैश-उल-अदल या दहशतवादी गटाच्या दोन तळांवर इराणने हल्ला केल्यानंतर सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात हा हल्ला झाला. पाकिस्तानने इराणला हवाई हल्ले केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला होता.
पाकिस्तानने इराणमधून आपल्या राजदूताला परत बोलावले होते. तेहरानने पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे घोर उल्लंघ केल्याचा आरोप केला होता. इराणचे हल्ले हे बेकायदेशीर कृत्य असल्याचे म्हणत, पाकिस्तानने तेहरानमध्ये इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तीव्र निषेध नोंदवला आहे.
इराणच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान खवळला आहे. पाकिस्तानने इराणमधील अनेक दहशतवादी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत, असे पाकिस्तानी मीडियाने म्हटले आहे. हा हल्ला कधी आणि कुठे करण्यात आला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.