विमान कंपन्यांचा व्हेनेझुएलाला जाण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2017 5:09 PM
व्हेनेझुएलामध्ये दररोज सरकारविरोधात निदर्शने आणि आंदोलने हे रोजचेच चित्र बनले आहे. या अस्थिर परिस्थितीकडे लक्ष वेधत अनेक विमान कंपन्यांनी व्हेनेझुएलामध्ये जाण्यास नकार दिला आहे.
ऑनलाइन लोकमत,कॅराकस, दि.7- तेलाच्या बळावर व्हेनेझुएलाला ताठ मानेने चालण्यास मदत करणाऱ्या ह्युगो चॅवेझ यांच्या निधनानंतर व्हेनेझुएलाची स्थिती चांगलीच बिघडली आहे. तेलाच्या घटत्या किमती आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मडुरो यांच्याविरोधात असणाऱ्या तीव्र असंतोषामुळे व्हेनेझुएलाची घडी विस्कटली आहे. बेसुमार चलनवाढ, वाढती बेरोजगारी यामुळे व्हेनेझुएलामध्ये दररोज सरकारविरोधात निदर्शने आणि आंदोलने हे रोजचेच चित्र बनले आहे. या अस्थिर परिस्थितीकडे लक्ष वेधत अनेक विमान कंपन्यांनी व्हेनेझुएलामध्ये जाण्यास नकार दिला आहे. एअर कॅनडा, अमेरिकन एअरलाइन्स, डेल्टा आणि लुफ्तान्सा या कंपन्यांनी प्रामुख्याने व्हेनेझुएलावर हा बहिष्कार घातला आहे. यापैकी काही कंपन्यांनी यापुर्वीच राजधानी कॅराकसमधील उड्डाणे कमी केली आहेत. व्हेनेझुएलामध्ये उड्डाण करण्यास सध्या सुरक्षित परिस्थिती नाही असे कारण या कंपन्यांनी पुढे केले आहे. एअर कॅनडाने आपली उड्डाणे मार्च महिन्यामध्येच बंद केली आहेत. जोपर्यंत व्हेनेझुएलामधील स्थिती स्थिर व उड्डाणे करण्यास सुरक्षीत वाटत नाही तोपर्यंत पुन्हा सेवा सुरु करणार नाही असे एअर कॅनडाने स्पष्ट केले आहे.व्हेनेझुएलाची स्थिती का बिघडली?ढासळलेली अर्थव्यवस्था हे व्हेनेझुएलामधील अशांततेचे प्रमुख कारण आहे. व्हेनेझुएलाच्या नॅशनल असेम्ब्लीच्या फायनान्स अॅंड डेव्हलपमेंट कमिशनच्या अहवालानुसार या वर्षाच्या अखेरीपर्यंत व्हेनेझुएलाची चलनवाढ 679.73 टक्क्यांवर जाऊन पोहोचेल. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने याहून धक्कादायक आकडेवारी जाहीर केली आहे, नाणेनिधीच्या अहवालात यावर्षी 720 टक्के चलनवाढ दिसून येईल तर पुढच्या वर्षी ती बेसुमार वाढून 20168.50 टक्क्यांवर जाऊन पोहोचेल अशी भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती कोसळल्यामुळे व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला आहे. यामुळे बेकारीचे प्रमाण वाढले असून समाजातील विविध घटकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. उपासमार आणि वस्तूंची कमतरता यामुळे सरकारविरोधात कॅराकसमध्ये दररोज निदर्शने केली जातात. ह्युगो चॅवेज यांचे राजकीय वारसदार म्हणून सत्तेवर बसलेल्या मडुरो यांच्याविरोधात विरोधीपक्षाने आणि नागरिकांनी आवाज उठवला आहे. मडुरो हे हुकुमशहा असून विरोधकांचा आणि लोकांचा आवाज दडपतात असा आरोप त्यांच्यावर केला जातो. तर या सगळ्यामागे अमेरिकेसह परकीय सत्तांचा हात असल्याचा आरोप मडुरो यांनी केला आहे.