ऑनलाइन लोकमत
काठमांडू, दि. 3 - नेपाळचं एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ सोमवारी सकाळी बंद ठेवण्यात आलं होतं. त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिबट्या दिसल्यानंतर विमानतळ जवळपास तासभर पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं. त्यानंतर बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला पण बिबट्या सापडला नाही.
विमानाच्या धावपट्टीजवळ एका वैमानिकाला सर्वात आधी हा बिबट्या दिसला. त्याने विमानतळावरील अधिका-यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही प्रवासी आणि विमानतळावरील कर्मचा-यांनाही बिबट्या दिसला होता. परिणामी विमानसेवेवर परिणाम झाला आणि अनेक विमानांचं उड्डाण उशीराने झाल्याचंही वृत्त आहे. विमानतळावरील सीसीटीव्हीमध्ये बिबट्याची दृश्य कैद झाल्याचंही सांगितलं जात आहे.
त्रिभुवन विमानतळाचा एक भाग शहराच्या बाजुने तर दुसरा भाग हा जंगलाशी जोडला गेला आहे. जंगलातूनच हा बिबट्या आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापुर्वीही येथे विमानतळावर अनेकदा जंगली प्राणी आल्याच्या घटना घडल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी अहमदाबाद विमानतळावर एक मोठा अपघात टळला होता. धावपट्टीवर ससा आल्यामुळे दोन विमानांची टक्कर झाली असती.