ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 27 - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आपल्या कुशल रणनीतीची चुणूक वेळोवेळी दाखवून दिली आहे. एवढेच नाही तर अडचणीत असलेल्या मोदींच्या मदतीसाठीही डोवाल धावून जात असतात. आज मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली असताना त्याचा प्रत्यय आला. मोदी आणि ट्रम्प यांची बहुचर्चित भेट झाल्यावर ट्रम्प यांचे भाषण मोदी गांभीर्याने ऐकत होते. त्याचदरम्यान, वाऱ्यामुळे मोदीच्या वक्तव्याच्या टाचणाची काही पाने विखुरली गेली. त्यावेळी भारताच्या अनेक ज्येष्ठ अधिकाऱ्यांसोबत पहिल्या पंक्तीत असलेल्या डोवाल यांनी चपळता दाखवत ती पाने एकत्र करून मोदींकडे परत दिली.
मात्र पुन्हा एकदा वाऱ्याची झुळूक आल्याने ही पाने पुन्हा विखुरली गेली. तेव्हा डोवाल यांनी पुन्हा एकदा या कागदपत्रांना एकत्र करत मोदींकडे सोपवले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील ही पहिलीच मुलाखत होती. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या सुरक्षित ठिकाणांचा मिळून खात्मा करण्याचा संकल्प केला आहे. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी दहशतवादाला लक्ष्य केलं. संयुक्त निवेदनामध्ये इस्लामिक दहशतवाद हा लोकशाहीसाठी खतरा असल्याचं सांगण्यात आलं तसंच याचा खात्मा करण्याचं आवाहन करण्यात आलं. संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोदींचा सच्चा दोस्त असा उल्लेख केला. तर, पंतप्रधान मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना सहकुटुंब भारतात येण्याचं निमंत्रण दिलं.