ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. ४ - 'अल कायदा' या दहशतवादी संघटनेची नजर आता भारतावर असून भारतीय उपखंडात या संघटनेची नवीन शाखा सुरू करत असल्याची घोषणा 'अल-कायदाचा' प्रमुख अयमान अल जवाहिरी याने केली आहे. जवाहिरीचा ५५ मिनिटांचा व्हिडिओ बुधवारी प्रसारित झाला आहे. भारत व उपखंडात 'जिहादचा झेंडा फडकवण्यासाठी' आणि 'इस्लाम'चे साम्राज्य स्थापन करणे या उद्देशाने ही शाखा स्थापन करत असल्याचे जवाहिरीने म्हटले आहे. एसआयईटीई या दहशतवादी निगरानी समूहच्या जिहादी फोरमने हा व्हिडिओ प्रसारित केला आहे.
कायदात अल जिहाद हे या संघटनेचे नाव असेल, असे जवाहिरीने नमूद केले आहे. ज्या ठिकाणी मुस्लीम आहेत, तेथे आमचा फोरम काम करेल. मुसलमानांना विभाजित करणा-या 'कृत्रिम सीमारेषांना' नष्ट करण्यास या संघटनेमुळे शक्ती मिळेल असेही त्याने व्हिडीओत म्हटले आहे. भारतीय उपखंडात अल कायदाची शाखा स्थापन होणे ही बर्मा, बांग्लादेश, आसाम, गुजरात, अहमदाबाद आणि काश्मीरमधील मुस्लिमांकरता चांगली बातमी असल्याचे त्याने म्हटले आहे. 'ही शाखा मुस्लिमांना अन्याय व अत्याचारांपासून वाचवेल', त्यासाठीच हा फोरम स्थापन केल्याचे जवाहिरी याने म्हटले आहे.
दरम्यान या व्हिडिओचा तपास करावा असा आदेश गृहमंत्रालयाने गुप्तचर संस्थांना दिला आहे.