वॉशिंग्टन : ओसामा बिन लादेननंतर अमेरिकेने ज्याच्यासाठी जंग जंग पछाडले तो सोमालियातील खतरनाक अल-शबाब या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अहमद अब्दी गोदाने याचा अखेर खात्मा झाला. अमेरिकेच्या हवाई हल्ल्यामध्ये तो मारला गेला.
अल-शबाब ही अल-काईदाशी संलग्न असलेली आफ्रिकेतील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटना आहे. अमेरिका गेल्या काही वर्षापासून गोदानेच्या मागावर होती. त्याला ठार करण्यासाठी यापूर्वी काही हल्ले करण्यात आले होते. मात्र, तो बचावला होता.
गोदाने मारला गेल्याच्या वृत्तास शुक्रवारी दुजोरा देताना व्हाईट हाऊसने गोदानेचा खात्मा हा अल-शबाबसाठी मोठा धक्का तर अमेरिकी गुप्तचर, लष्कर व पोलीस दलाने अनेक वर्षे केलेल्या अविश्रंत परिश्रमाचे फलित असल्याचे म्हटले. अमेरिकी संरक्षण मंत्रलय पेंटागनचे प्रसिद्धी सचिव रिअर अॅडमिरल जॉन किर्बी यांनी सांगितले की, अल-शबाबचा सहसंस्थापक अहमद गोदाने मारला गेला, असे आम्ही आता अधिकृतरीत्या म्हणू शकतो. गोदानेला सोमवारी लक्ष्य बनविण्यात आले. ड्रोन आणि लढाऊ विमानांनी अल-शबाब कमांडरांच्या मेळाव्यावर तुफान हल्ला केला, असे किर्बी यांनी यापूर्वी सांगितले होते. अमेरिकी परराष्ट्र मंत्रलयाच्या आठ सर्वात खतरनाक दहशतवाद्यांच्या यादीत गोदानेचा समावेश होता.
(वृत्तसंस्था)