बँकॉक- थायलंडमध्ये गुहेत अडकलेल्या फूटबॉलपटूंच्या मदतीसाठी अमेरिकन अंतराळउद्योजक एलन मस्क धावला आहे. एलन मस्कने 'प्रोटोटाइप सबमरिन'ची मदत देऊ केली आहे. या गुहेत अजूनही 5 मुले अडकलेली आहेत. 'मी आताच तीन नंबरच्या गुहेतून बाहेर आलो आहे' असे ट्वीट एलन मस्कने केले आहे.
इन्स्टाग्रामवरती एलनने पाण्याने भरलेल्या या गुहेतील व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. अजूनही आत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरुच आहेत. त्यांच्या मदतीसाठी एलनने मिनिसब देऊ केली आहे.'' एकावेळेस दोन पाणबुड्या व्यक्तींना घेऊन जाऊ शकेल आणि अत्यंत चिंचोळ्या जागेतून ती प्रवास करु शकेल'' असं एलनने स्पष्ट केलं आहे. ''आत बसलेल्या व्यक्तीला पोहणं आलंच पाहिजे असं नाही तसेच ऑक्सीजन कुप्यांचा वापर कसा करायचा हे माहिती नसलं तरी चालतं'' असं एलनने या मिनिसबची माहिती देताना सांगितले.