चीनचे दिग्गज व्यावसायिक आणि अलीबाबाचे को फाऊंडर जॅक मा अचानक पाकिस्तानच्या दौऱ्यावर पोहोचले होते. एका मीडिया रिपोर्टमध्ये त्यांच्या या सरप्राईज व्हिझिटचा खुलासा झालाय. रिपोर्टनुसार बोर्ड ऑफ इन्व्हेस्टमेंटचे माजी चेअरमन मोहम्मद अजफार अहसान यांनी जॅक मा यांच्या या दौऱ्याची पुष्टी केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार जॅक मा २९ जून रोजी लाहोरमध्ये आले होते आणि त्या ठिकाणी ते २३ तास होते. या दरम्यान त्यांनी सरकारी अधिकारी आणि माध्यमांशी संवाद साधला नाही. समोर आलेल्या माहितीनुसार ते एका खासगी ठिकाणी राहिले आहेत. त्यानंतर ते पुन्हा एका खासगी जेटनं परत गेले.
जॅक मा यांच्यासोबत चीनचे पाच, डेनमार्कचे एक आणि अमेरिकेच्या एका व्यावसायिकाचा समावेश होता. हे सर्वच हाँगकाँगच्या बिझनेस एव्हिएशन सेक्टरहून चार्टर्ड विमानानं नेपाळमार्गे पाकिस्तानात पोहोचले होते. कोणत्या कारणासाठी ते पाकिस्तानात गेले होते याचा मात्र खुलासा झालेला नाही. दरम्यान, पाकिस्तानात व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले असू शकतात अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या.
चीनच्या दुतावासाला माहिती नाहीजॅक मा यांचा हा दौरा पूर्णपणे वैयक्तिक होता आणि याची चीनच्या दुतावासाला कल्पनाही नव्हती असं अहसान यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं. तर दुसरीकडे पर्यटनाच्या दृष्टीनं पाकिस्तानची प्रतीमा उंचावली असल्याचा दावा पाकिस्तान सॉफ्टवेअर हाऊसेस असोसिएशन फॉर आयटी अँड आयटीईएलएचे चेअरमन झोहेब खान यांनी केला. याशिवाय पाकिस्तानच्या आयटी क्षेत्राबद्दल जॅक मा यांनी काही वक्तव्य केलं तर त्याचाही मोठा परिणाम होऊ शकतो असं ते म्हणाले.