स्त्री-पुरुष समानतेचा संघर्ष जगभरात हजारो वर्षांपासून सुरू आहे आणि आता तर हा संघर्ष, शाब्दिक हाणामारी अवकाशतही सुरू झाली आहे. अवकाशात जाण्याचा (पहिला) अधिकार कोणाचा? स्त्रीचा की पुरुषाचा? की दोघांचा? अंतराळात जाण्याचा अधिकार स्त्री-पुरुष दोघांचाही असेल, तर मग आतापर्यंत अंतराळात गेलेल्या स्त्रियांची संख्या इतकी कमी कशी? इतक्या वर्षांत आजवर जगभरातून केवळ ६७ स्त्रिया अंतराळात गेल्या आहेत.. त्याबद्दल दबक्या आवाजात चर्चाही सुरू झाली आहे. अमेरिकेतील जगप्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’नंही याबाबत महिलांवर अन्यायच केला असल्याचा आरोप होत आहे. कारण या संस्थेनंही पुरुषांच्या तुलनेत खूप कमी महिलांना अंतराळात जाण्याची संधी दिली !
महिलांना अंतराळप्रवास नाकारण्याचा प्रकार तसा जुना आहे. काही दिवसांपूर्वीच ८२ वर्षीय आजी वॉली फंक अंतराळात जाऊन आल्या. अमेझॉनचे संस्थापक आणि अब्जाधीश जेफ बेझोस यांनी काही दिवसांपूर्वीच अंतराळात नेलेल्या ‘न्यू शेफर्ड’ मोहिमेत या वॉली आजींचा समावेश होता. अंतराळात जाणाऱ्या त्या सर्वांत वयोवृद्ध महिला ठरल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आज ८२ वर्षांच्या असलेल्या वॉली आजी तब्बल साठ वर्षांपूर्वीच अंतराळात पोहोचल्या असत्या. १९६०मध्ये नासाच्या सर्व चाचण्याही त्या पास झाल्या होत्या, पण १९६१ सालच्या या मोहिमेसाठी ऐनवेळी त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. काय होतं यामागचं कारण? - त्या ‘महिला’ असल्यानंच त्यांना अंतराळवारी नाकारण्यात आली होती, असं सांगितलं जातंय. पण जिद्दी वॉली आजी या वयातही अंतराळात जाऊन आल्यानं अंतराळात जाण्याच्या महिलांच्या उर्मीला मोठं बळ मिळालं आहे. अंतराळात जाणारी व्हॅलेन्टिना तेरेश्कोवा ही पहिली अंतराळवीर महिला. रशियाची ही महिला १९६३मध्ये अंतराळात गेली होती.
भारतीय वंशाच्या तीन महिला आतापर्यंत अंतराळात जाऊन आल्या आहेत. त्यात कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांचे नाव सगळ्यांनाच माहीत आहे. अलीकडेच श्रीशा बांधा ही महिलाही अंतराळात जाऊन आली...पण अंतराळात जाणाऱ्या महिलांचं प्रमाण कमी का, याबाबत नासानं नुकताच एक ‘खुलासा’ केला आहे. नासाच्या संशोधकांच्या मते, महिला अंतराळात जाऊ शकत नाहीत, असं नाही, पण पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या आरोग्यावर त्यामुळे जास्त विपरित परिणाम होतो. अंतराळात असताना तेथील उच्च दर्जाच्या हानिकारक विकिरणांच्या दुष्परिणामांना महिला जास्त प्रमाणात बळी पडतात. या विकिरणांमुळे पुरुषांपेक्षा महिलांमध्ये कॅन्सर आणि हृदयविकाराचा धोका वाढतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
नासा संशोधकांच्या म्हणण्यानुसार अंतराळातील रेडिएशनचा महिलांवर नेमका काय दुष्परिणाम होतो, हे तंतोतंत सांगता येणार नाही, पण अंतराळ प्रवास केलेल्या महिलांची प्रकृती तुलनेनं जास्त खालावल्याचा त्यांचा अनुभव आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणुबॉम्बचे काय दुष्परिणाम झाले, याचाही अभ्यास नासाचे शास्त्रज्ञ करीत आहेत. त्यात त्यांना आढळून आलं की, विकिरणांना सामोरं जाताना पुरुषांपेक्षा महिलांवर जास्त प्रमाणात दुष्परिणाम होतात. महिलांच्या बाबतीत ‘दुजाभाव’ केल्याचा एक प्रकारचा खुलासा करताना नासाच्या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे, अंतराळातील विकिरणांमुळे महिलांना कॅन्सर आणि थायरॉइडचा धोकाही जास्त असतो, त्यामुळेच नासानं आजवर पुरुषांच्या तुलनेत कमी महिलांना अंतराळात पाठवलं आहे.
प्रामुख्याने सूर्य आणि आकाशगंगेतून निघालेल्या कॉस्मिक किरणांमुळे भारीत कणांचा पृथ्वीवर सातत्यानं वर्षाव होत असतो. प्रकाशाच्या वेगानं सौरमंडलावर प्रवास करताना विद्युतभारीत कण मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉन बाहेर फेकत असतात. परंतु पृथ्वीला एक चुंबकीय क्षेत्र आहे, सूर्याच्या दिशेने आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ६५ हजार किलोमीटर अंतरापर्यंत ते पसरलेले आहे. हे चुंबकीय क्षेत्र हानिकारक किरणांपासून ढाल म्हणून कार्य करते. त्यामुळे अवकाशात असताना अंतराळवीरांना या किरणोत्सर्गाचा फारसा त्रास होत नाही, पण या कक्षेच्या बाहेर गेल्यानंतर मात्र किरणोत्सर्गाचे दुष्परिणाम महिलांवर जास्त दिसू लागतात, असं स्पष्टीकरण नासानं दिलं आहे.
महिलांना चक्कर, पुरुषांना अंधारी !अंतराळात महिला आणि पुरुषांवर होणारे परिणाम वेगवेगळे आहेत. महिलांचं आजारी पडण्याचं प्रमाण जास्त आहे, तर पुरुषांना पृथ्वीच्या वातावरणात परत येताना जास्त त्रास होतो. पृथ्वीच्या कक्षेत परत येत असताना महिलांचं ब्लड प्रेशर वाढू शकतं, चक्कर येऊ शकते, तर पुरुषांना तात्पुरत्या काळासाठी दृष्टी अंधुक होण्याचा आणि ऐकायला कमी येण्याचा त्रास होऊ शकतो. हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे हा परिणाम होतो की मानसिक बदलांमुळे, यावर अजून संशोधन होणे बाकी आहे. हे संशोधन झाल्यावर त्यावर अधिक प्रकाश पडू शकेल आणि कदाचित अवकाशातही स्त्री-पुरुष समानता वाढीस लागेल असं संशोधकांचं म्हणणं आहे.