पूर्वीच्या काळी कोणाही वडीलधाऱ्यास नमस्कार केला की, स्त्री-पुरुषांना दोन आशीर्वाद ते नेहेमी द्यायचे. त्यात महिलांसाठी असायचा, ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भव’ आणि दुसरा असायचा ‘शतायुषी भव’!...काळाच्या ओघात हे आशीर्वाद आता मागे पडले, आधुनिक जीवनशैलीमुळे लोकांचे आरोग्य बिघडले, लहान वयातच अनेक विकारांना ते बळी पडू लागले; पण म्हणून शतायुषी होण्याचे प्रमाण कमी झाले असे नाही. काही ठिकाणी तर ते वाढतच गेले.संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार सध्याच्या घडीला वयाची शंभरी पार करणाऱ्या लोकांची जगातील संख्या आहे, सुमारे पाच लाख ७३ हजार! जगात शतायुषी लोकांची सर्वाधिक संख्या अमेरिकेत, ९७ हजार म्हणजे जवळजवळ लाखभर आहे. त्यानंतरचा देश आहे जपान. इथेही शंभरी पार केलेल्या लोकांची संख्या ७९ हजार इतकी प्रचंड आहे. हे प्रमाण दहा हजारांमागे सहा जण म्हणजे ०.०६ टक्के इतके आहे. सध्याच्या घडीला जगातील सर्वाधिक वयोवृद्ध व्यक्ती म्हणजे जपानमधील केन टांका ही महिला. ती ११७ वर्षांची आहे.
जगातला सर्वांत वयोवृद्ध पुरुष ११२ वर्षांचा आहे. स्पेनमध्ये राहणाऱ्या या ‘खापरपणजोबांचं’ नाव आहे, सॅटरनिनो डे ला फेंट! युरोपात फ्रान्स, स्पेन आणि इटली या देशांतील शतायुषी लोकांची संख्या सर्वांत जास्त आहे. दहा हजारांत तीन म्हणजे ०.०३ टक्के शतायुषी लोक इथे आहेत. उरुग्वे, हाँगकाँग आणि पुएर्तो रिको या देशांतही शंभरी पार केलेल्या लोकांची संख्या बरीच आहे.सध्या अमेरिकेत शतायुषी लोकांची संख्या सर्वाधिक असली तरी जगात असे एक ठिकाण, परिसर आहे, जिथल्या लोकांना आयुष्याचे दान मिळाले आहेआणि तिथल्या अनेक लोकांनी शंभरी पार केलेली आहे. तिथले अनेक लोक ९० वर्षांपर्यंत तर सहजच जगतात!या प्रांताचे नाव आहे सर्दिनिया आणि हे बेट आहे इटलीचा एक भाग !
सर्दिनिया हा जगातील पाच प्रांतांपैकी असा एक प्रांत आहे, जिथे लोकांना आयुष्याचे वरदान मिळाले आहे आणि बहुतांश लोक नव्वद- शंभर वर्षे सहजपणे जगतात. त्यातही शंभरी पार केलेल्या लोकांची संख्या इथे जगात सर्वाधिक आहे. वयाची सत्तरी, ऐंशी, नव्वदी पार केलेले तर हजारो लोक इथे आहेत; पण सध्याच्या घडीला ५३४ लोकांनी वयाची शंभरी मागे टाकली आहे. म्हणजे एक लाख व्यक्तींमागे सरासरी ३७ लोक वयाच्या शंभरीआधी यमराजाला आपल्या आसपास फिरकू देत नाहीत!इटलीत शंभरी पार केलेल्या ‘जवानां’ची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. इटलीत २००९ मध्ये शतायुषी लोकांची संख्या अकरा हजार होती, २०१९ मध्ये ती १४,४५६ झाली आणि २०२१मध्ये आणखी वाढून ती १७,९३५ झाली!
इटलीतील सर्दिनिया या प्रांताचे आणखी एक वैशिष्ट्य. याच परिसरात पेरडेसडेफिगू नावाचे एक छोटेसे गाव आहे. या गावातील सर्वाधिक लोकांनी आतापर्यंत शंभरी पार केली आहे. दरवर्षी इथले किमान पाच-दहा लोक तरी असे असतात, ज्यांनी आयुष्याचे शतक पार केले आहे! राष्ट्रीय सरासरी आयुर्मानापेक्षा इथल्या लोकांचे आयुष्य तब्बल १३ टक्क्यांनी अधिक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे वय इतके वाढलेले असले तरी इथले सर्वच लोक कार्यरत आहेत. शंभरी पार केलेले लोकही अजून समारंभांना जातात, फिरतात, भाषणे करतात... दरवर्षी इथे एक छोटेखानी साहित्य संमेलन भरवले जाते. सारे ज्येष्ठ नागरिकच या समारंभाचे आयोजन करतात. यंदा या साहित्य संमेलनाचे आयोजन केले होते वयाची ऐंशी पार केलेले पत्रकार मेलिस यांनी. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे राज्यशास्त्राचे जागतिक अभ्यासक प्रो. जोनाथन हॉपिकन यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्याशी चर्चा करण्यात आघाडीवर होते ते १०३ वर्षांचे अँटोनिया ब्रुंडू आणि शंभर वर्षांचे विटोरियो लाय!
काय आहे इथल्या लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य? इथले लोक नाबाद शंभरी कशी गाठतात? १०५ वर्षांच्या मोलीस म्हणतात, आमच्या इथली हवा अतिशय शुद्ध आहे, आम्ही सारे जण अतिशय गुण्यागोविंदाने राहतो, आमची सामुदायिकतेची भावना अतिशय तीव्र आहे. शंभर वर्षांच्या गॅब्रिएल गार्सिया यांचे म्हणणे आहे, घरचे खाणे, भरपूर गप्पा मारणे आणि पुस्तक वाचन हे आमच्या दीर्घायुष्याचे सार आहे, आणि हो आमच्यापैकी कुणीच वृद्धाश्रमात राहत नाही, आपापल्या घरीच, मुलेबाळे, नातवंडांमध्ये आम्ही राहतो, म्हणून मृत्यू आमच्या दारात यायला घाबरतो, असेही अनेक जण हसून सांगतात.
इथले ‘सर्वच’ लोक मारतात ‘सेंच्युरी’!जगात ज्या ठिकाणी लोक सर्वाधिक जगतात, शंभरी पार करतात, अशा जगभरातील पाच ठिकाणांनी आपल्या दीर्घायुष्याचा इतिहास लिहिला आहे. त्याला ‘ब्लू झोन्स’ असेही म्हटले जाते. ती पाच ठिकाणे आहेत, सर्दिनिया (इटली), ओकिनावा (जपान), निकोया (कोस्टा रिका), इकारिआ (ग्रीस) आणि लोमा लिंडा (अमेरिका)