नवी दिल्ली : इस्लामविरोधी ट्विट केल्याप्रकरणी दुबईतील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये काम करणा-या भारतीय शेफला नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. अतुल कोचर असे या शेफचे नाव आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिची भूमिका असलेल्या क्वांटिको मालिकेतील एका भागात हिंदू राष्ट्रभक्तांना दहशतवादी संबोधण्यात आले होते. मात्र, याबाबत प्रियांका चोप्राने ट्विटरवर माफी मागितली होती. प्रियांका चोप्राच्या ट्विटला अतुल कोचर यांनी रिट्विट केले होते. या रिट्विटमध्ये अतुल कोचर यांनी लिहिले होते की, हे फारच दुखदायक आहे. गेल्या 2000 वर्षांपासून इस्लाममधून दहशतवादी निर्माण होत असताना हिंदूंना दहशतवादी संबोधून त्यांच्या भावना दुखावण्यात आल्या आहेत. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.
अतुल कोचर ट्विटवर नेटकरी अक्षरशः तुटून पडले. त्यानंतर ते ट्विट डिलीट करत अतुल कोचर यांनी माफीसुद्धा मागितली. कोचर म्हणाले, माझ्या टि्वटची मला कोणतंही स्पष्टीकरण द्यायचं नाही. मी माझी चूक कबूल करतो. इस्लामची सुरुवात 1400 वर्षांपूर्वी झाली आहे. त्यामुळे मी मनापासून माफी मागतो. मी इस्लामविरोधी नाही. मला माझ्या विधानांवर खेद आहे.
जेडब्ल्यू मेरियट हॉटेलने अतुल कोचर यांच्या विधानांपासून हात झटकले आहेत. अतुल कोचर यांच्या विधानांची आम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही त्यांच्या विधानांचे समर्थन करत नाही. आमचे हॉटेल सर्वसमावेशक असून, विविध संस्कृतीच्या प्रतीकाचा हॉटेलला गर्व आहे, असे यासंदर्भात हॉटेलकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. मात्र, आता इस्लामविरोधी ट्विट असल्याचे कारण देत त्यांना जेडब्ल्यू मार्किस हॉटेलमधून नोकरीवरुन काढून टाकण्यात आले आहे. हॉटेलचे व्यवस्थापक बिल केफर म्हणाले की, अतुल कोचर यांच्या ट्विटनंतर आम्ही त्यांचा करार रद्द केला आहे. आता ते हॉटेलमध्ये काम करु शकणार नाहीत.