ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 22 - हेरगिरीच्या कथित आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडिओ पाकिस्तानकडून प्रसारित करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कुलभूषण जाधव हे आपला कबुलीजबाब देताना दिसत असून, जाधव यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुखांकडे माफीनामा मागितल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात येत आहे.
पाकिस्तानी लष्कराकडून हा कथित व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे. हा व्हिडिओ यावर्षी एप्रिल महिन्यात चित्रित करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कुलभूषण जाधव हे 2005 आणि 2006 साली आपण कराचीचा दौरा केल्याचे कबूल करताना दिसत आहेत. तसेच 2014 साली मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर भारतीय गुप्तहेर यंत्रणांनी आपल्याला पाकिस्तानमध्ये हेरगिरी आणि कारवाया करण्याची जबाबदारी दिल्याचे सांगत आहेत. पाकिस्तानमधील आयएसपीआरचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी आज फेसबुकवरून जाधव यांनी केलेल्या दया याचिकेची माहिती दिली. तसेच त्यांनी कुलभूषण जाधव यांच्या कबुलीनाम्याचा व्हिडिओसुद्धा प्रसारित केला.
मे महिन्यामध्ये हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती. भारताने केलेल्या याचिकेवर नेदरलँड्समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आपला निकाल सुनावताना हा निर्णय दिला होता. अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही, असे आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केले होते.