न्यूयॉर्क : जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसच्या उद्रेकातून अद्याप जग सावरले नसतानाच अमेझॉनच्या जंगलातून नवीन महामारी फैलावण्याचा इशारा ब्राझीलचे पर्यावरणतज्ज्ञ डेव्हिड लापोला यांनी दिला आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकाच्या काळात जंगलांवर मोठ्या प्रमाणावर कु-हाड चालवण्यात आल्यामुळे हा धोका उद्भवू शकतो, असेही त्यांनी म्हटलेआहे.जंगलांचे शहरीकरणात रूपांतर झाल्यामुळे प्राण्यांमधून मानवात रोग फैलावू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जंगलांवर संशोधन करणारे ३८ वर्षीय लापोला यांनी म्हटले आहे की, अमेझॉन जंगल हे जंगलातून पसरणाºया व्हायरसचे मोठे भांडार आहे. अमेझॉनच्या रूपाने जगातील सर्वांत मोठे पावसाच्या पाण्यावर तयार झालेले जंगल संपत आहे.राष्टÑाध्यक्ष जैरे बोल्सोनारो यांच्या कार्यकाळातील पहिल्या वर्षात ब्राझीलमध्ये अमेझॉनच्या जंगलतोडीमध्ये तब्बल ८५ टक्के वाढ झाली. या वर्षीसुद्धा जानेवारी ते एप्रिलपर्यंत मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने जंगलतोड सुरू आहे, असे ब्राझीलच्या राष्टÑीय अंतराळ संशोधन संस्थेने (आयएनपीई) म्हटले आहे.या वर्षी तर जंगलतोडीचे नवे रेकॉर्ड करण्यात आले असून, तब्बल १२०२ वर्ग किलोमीटरवरील झाडे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. लापोला यांनी म्हटले आहे की, ही बाब केवळ आपल्या ग्रहासाठीच घातक आहे असे नव्हे तर मानवी आरोग्यासाठीही चिंताजनक आहे.वर्षावन व समाजाचे नाते घट्ट करावे लागेल- वर्षावन व समाजाचे नाते घट्ट करावे लागेल, अन्यथा मोठ्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल.आजवर अनेक आजारांचे मूळ दक्षिण आशिया व आफ्रिकामध्ये केंद्रित होते. त्यांचे कारण बहुतांश वेळा वटवाघुळाच्या काही प्रजातींशी संबंधितहोते.परंतु अमेझॉनमधील समृद्ध जैवविविधतेमुळे हा भाग जगातील सर्वांत मोठा कोरोना व्हायरसचा भाग बनू शकतो.याचे सर्वांत मोठे आणि पहिले कारण म्हणजे अमेझॉन जंगलांचा ज्या पद्धतीने वापर केला जात आहे, तो केला जाऊ नये.दुसरे म्हणजे येथील अवैध शेती, खनिक व जंगलतोड करणारांकडून मोठ्या प्रमाणावर लाकूडतोड होत आहे.आम्हाला आमचा समाज व वर्षावन यांच्यातील नाते घट्ट करण्याची गरज आहे. अन्यथा आपल्याला अनेक उद्रेकांना सामोरे जावे लागेल.
तज्ज्ञ काय म्हणतात?लापोला यांचे म्हणणे आहे की, जेव्हा तुम्ही पारिस्थितिक असमानता निर्माण करता, तेव्हा एखादा व्हायरस प्राण्यातून मानवात उत्पन्न होऊ शकतो. एचआयव्ही, इबोला व डेंग्यू हेही अशाच प्रकारे तयार झाले होते. हे सर्व पारिस्थितिक असंतुलनामुळे मोठ्या प्रमाणावर फैलावले होते.